जुनी निवृत्ती वेतन योजना चालू करणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
विधानसभा प्रश्नोत्तरे…
राज्य दिवाळखोरीत, राज्यावर १ लाख १० सहस्र कोटींचा बोजा पडेल !
नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – जुनी निवृत्ती वेतन योजना शासन चालू करणार नाही; कारण हे वेतन दिल्यास राज्यावर १ लाख १० सहस्र कोटी रुपयांचा बोजा पडून राज्य दिवाळखोरीत निघेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ डिसेंबर या दिवशी प्रश्नोत्तराच्या घंट्यात दिली. विनाअनुदानित, तसेच अंशत अनुदानित शाळांना अनुदान कधी देणार ?, असा प्रश्न सदस्य संजय शिंदे यांनी उपस्थित केला होता. त्यावर प्रारंभी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिले.
सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यापुढे विनाअनुदानित शाळांना अनुदान देणार नाही. वर्ष २०१० मध्ये आपण २० टक्क्यांऐवजी ४० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या वेळी घोषित आणि अघोषित शाळांनी त्रुटींची पूर्तता करूनही फक्त ३५० शाळा शिल्लक होत्या. आता अनुदान देता देता शाळांची संख्या ३ सहस्र ९०० इतकी झाली आहे. या शाळांना अनुदान देतो म्हटले, तरी पुढील ३ वर्षांत ५ सहस्र कोटी रुपयांचा बोजा पडेल. आम्ही छातीला माती लावून ३५० शाळांना एकदाचे अनुदान दिले; पण यापुढे देता येणार नाही.
Devendra Fadanvis | जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही ; देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत माहिती https://t.co/Tfz6XKT6rq @Dev_Fadnavis
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) December 21, 2022
देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना ‘भीक’ या शब्दाचा अर्थ सांगितला !
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापुढे फक्त स्वयंअर्थसाहाय्यित शाळांनाच अनुमती देता येईल, असे घोषित केले. त्यावर बोलतांना छगन भुजबळ यांनी शाळांसाठी ‘भीक’ मागून निधी जमवला, तर अनुमती मिळेल का ? असा खोचक प्रश्न विचारला. त्यावर सभागृहात खसखस पिकली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर उत्तर देताना दिवंगत साहित्यकार प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘माझी जीवनगाथा’ या पुस्तकातील उतारा वाचून ‘भीक’ या शब्दाचा अर्थ छगन भुजबळ यांना समजावून सांगितला.