शाळा-महाविद्यालय परिसरात सीसीटीव्ही लावण्याविषयी २ सचिवांची समिती स्थापन करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
विधान परिषदेतून…
नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – शाळेत होत असलेल्या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी तेथे टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, तसेच शाळा महाविद्यालय परिसरात असलेल्या कॅफेट एरियांवर निर्बंध लावावेत, अशी आग्रही मागणी विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २१ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत केली. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विनाअनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याविषयी सक्ती करण्याची सूचना केली जाईल. शक्य असल्यास साहाय्य दिले जाईल, तसेच अल्पवयीन मुलींना लैंगिक शिक्षणाविषयी ‘गुड टच, बॅड टच’चे पोलीस दीदींकडून धडे देण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी २१ डिसेंबर या दिवशी हा प्रश्न उपस्थित केला होता.
Devendra Fadnavis on school CCTV: शाळा-कॉलेजमध्ये CCTV बसवणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा#DevendraFadnavis #CCTV #शाळाकॉलेज #Nagpur #Maharashtra https://t.co/izXtlS7vTx
— ABP माझा (@abpmajhatv) December 21, 2022
अंबादास दानवे म्हणाले की, अल्पवयीन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे आणि शाळेत सीसीटीव्ही बसवणे आवश्यक आहेत. त्याविषयी सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत का ?, तसेच अल्पवयीन मुलांच्या हातून लैंगिक गुन्ह्यांचे प्रकार समोर येत आहेत, त्यामुळे शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. अकोला, बीडसारख्या जिल्ह्यांत महाविद्यालय परिसरात असलेल्या ‘कॅफेट एरिया’मध्ये मुलींवर घडलेले प्रकार त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून यावर कठोर निर्बंध घालण्याची मागणी केली. ‘महाविद्यालय परिसरातील ‘कॅफेट एरिया’वरील निर्बंध आणि शाळेत सीसीटीव्ही लावण्याविषयी २ सचिवांची समिती सिद्ध करण्यात येईल’, असे आश्वासन गृहमंत्री फडणवीस यांनी दिले.