मेंढपाळांवर खोटे गुन्हे नोंद करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करावी ! – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

विधान परिषद लक्षवेधी…

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात ठिकठिकाणी मेंढपाळांना मारहाण करून त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंद करण्याचे प्रकार समोर येत आहेत. खोटे गुन्हे नोंद करणार्‍या संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २१ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडतांना केली. मेंढपाळांना उदरनिर्वाहासाठी गावात काही जमीन क्षेत्र राखीव ठेवावे आणि प्रायोगिक तत्त्वावर चराई वनभूमी मेंढपाळांना उपलब्ध करून द्यावी, तसेच पशुविमा संरक्षण देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

याला उत्तर देतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, कोणताही गुन्हा नोंद करतांना सखोल चौकशी करावी, अशा सूचना गृहविभागाने ९ वेळा दिल्या आहेत. असे असतांनाही काही पोलीस ठाण्यांत पोलीस अधिकारी चुकीच्या पद्धतीने अन्याय आणि अत्याचार करून खोटे गुन्हे नोंद करत असतील, तर त्याची माहिती दिल्यास व्यक्तीगत चौकशी केली जाईल. मेंढपाळांना उदरनिर्वाहासाठी ९०० हेक्टर जमीन निश्चित केली असून ती अर्धबंदिस्त स्वरूपात असणार आहे, तसेच या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांना विनंती करून सर्व सचिव संबंधित मंत्री आणि चर्चेत विविध सूत्रे उपस्थित केलेले सदस्य यांची एकत्रित बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.