भाजप-शिंदे गट २ सहस्र ७९५, तर महाविकास आघाडीचा २ सहस्र ७१५ ग्रामपंचायतींमध्ये विजय !
महाराष्ट्रातील ७ सहस्र ७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर !
मुंबई – राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल २० डिसेंबरला लागले. यातील ७ सहस्र ७५१ ग्रामपंचायतींपैकी सायंकाळी ६ वाजेपर्यंत भाजप-शिंदे गट २ सहस्र ७९५ ग्रामपंचायती (भाजप २ सहस्र २३ आणि शिंदे गट ७७२), महाविकास आघाडी २ सहस्र ७१५ ग्रामपंचायती (राष्ट्रवादी काँग्रेस – १ सहस्र २१५, उद्धव ठाकरे गट – ६३९, काँग्रेस – ८६१), तर १ सहस्र १३५ ग्रामपंचायतींमध्ये अपक्ष आणि अन्य यांना विजय मिळाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठी असलेल्या पुलाची-शिरोलीत सत्तांतर झाले असून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याकडून सत्ता खेचून घेऊन भाजपचा महाडिक गट विजयी झाला आहे. भाजपच्या महाडिक गटाने १८ पैकी १७ जागा मिळवल्या आहेत. महाडिक गटाच्या पद्मजा करपे यांनी सरपंचपद जिंकले आहे.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील २२१ पैकी ७४ ग्रामपंचायतींचा निकाल घोषित झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४६, तर भाजपला ११ ग्रामपंचायती मिळाल्या आहेत.
सोलापूर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप आघाडीवर !
सोलापूर – जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला असून भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादीने स्वत:चे वर्चस्व सिद्ध केले, तर शिंदे गटाने शिवसेनेच्या ठाकरे गटापेक्षा अधिक जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. सोलापुरात १८९ जागांसाठी मतदान पार पडले. उत्तर सोलापुरात भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख सत्ताधारी आहेत; मात्र या ठिकाणी माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या महाविकास आघाडीच्या समर्थक पॅनलला मोठे यश मिळाले आहे. शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून सांगोला तालुक्यात स्वत:ची प्रतिष्ठा राखली आहे.