भोसरी (पुणे) येथे २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषद’ !
महोत्सवामध्ये शोभायात्रा, कामधेनू यज्ञ आणि सप्तधेनू परिक्रमा !
पुणे – भोसरी येथील गोधाम (पांजरपोळ) येथे २१ ते २५ डिसेंबर या कालावधीमध्ये ‘जनमित्र सेवा संघ’ आणि विविध सहयोगी सदस्य संस्था यांच्या वतीने गो आधारित आत्मनिर्भर ग्राम असे उद्दिष्ट ठेवून कामधेनू महोत्सव अर्थात् ‘विश्व गो परिषद २०२२’ आयोजित करण्यात आलेली आहे. या कालावधीत कामधेनू यज्ञ आणि सप्तधेनू परिक्रमा होणार आहे. शोभायात्रा २१ डिसेंबर या दिवशी सकाळी ८ वाजता भोजपूर ग्रामदैवतपासून पांजरपोळपर्यंत काढण्यात येईल. त्यानंतर पांजरपोळचे विश्वस्त ओमप्रकाश रांका, मुकेश अगरवाल, देवीचंद अगरवाल, जांभेकर गुरुजी यांच्या हस्ते कामधेनू यज्ञाचा प्रारंभ होणार आहे. कार्यक्रमाच्या मुख्य दिवशी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, नारायणपूर येथील श्री विश्वचैतन्य जगद्गुरु नारायण महाराज, आळंदी येथील ह.भ.प. शांतीब्रह्म मारुति महाराज कुर्हेकर, प.पू. यति अनिरुद्ध तीर्थ महाराज, वल्लभभाई कथेरिया, विजय भाटकर आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
या परिषदेत विविध स्तरांवरील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन असणार आहे. गोमाता विषयक माहितीचे चित्रप्रदर्शन आणि गो आधारित, तसेच अन्य उत्पादन हेतू विक्री केंद्रे असतील. कामधेनू यज्ञासाठी हरिद्वार येथून प.पू. अग्नितीर्थ स्वामीजी आणि त्यांचे शिष्य यांचे आगमन झाले आहे. या महोत्सवासाठी अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
कामधेनू महोत्सवाची वैशिष्ट्ये
१. कामधेनू यज्ञ – मन:शांती, स्थैर्य, आरोग्यप्राप्ती, स्व-कुटुंब कल्याण एवं आर्थिक समृद्धी यांसाठी ५ दिवसांचे कामधेनू यज्ञ/ सुरभी यज्ञ यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
२. सप्तधेनू परिक्रमा – यामध्ये ७ गोमातांची परिक्रमा करण्याआधी आणि नंतर आपल्या शरिरातील सकारात्मक ऊर्जा किती आहे ? याचे परीक्षण केवळ काही मिनिटांत करता येईल. आपले स्वास्थ्य आणि मन:शांती उत्तम ठेवण्यासाठी याचा लाभ होऊ शकतो.
गो परिषदेची वैशिष्ट्ये
१. गोमाता संगोपन, संवर्धन, आदर्श गोशाळा निर्मिती यांविषयी माहिती देण्यात येईल.
२. गोआधारित पर्यावरण, आरोग्य, गो उत्पादने, पंचगव्य चिकित्सा, गोआधारित सेंद्रीय शेती एवं विषमुक्त अन्ननिर्मिती यांवर मार्गदर्शन होणार आहे.
३. यशस्वी शेतकर्यांचे मार्गदर्शन
४. पंचगव्य रुग्णालय, गोमाता संरक्षण आधार केंद्र स्थापना, गोमाता चिकित्सा केंद्र स्थापना करण्यासाठी साहाय्य करण्यात येईल.
५. गायींवर आधारित कामधेनू विद्यापिठाची स्थापना होणार आहे.