श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात राजकीय दबाव असल्याची शंका येते ! – आमदार आशिष शेलार, भाजप
नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – श्रद्धा वालकर हिने केलेल्या तक्रारीमध्ये २३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी स्वत:ला मारहाण झाली असल्याचे तिने स्पष्ट लिहिले होते. असे असतांना त्यावर कारवाई का करण्यात आली नाही ? त्यामुळे हा प्रकरणात राजकीय दबाव असल्याची शंका येते, असा संशय भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत आमदार अतुल भातखळकर यांच्या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेच्या वेळी व्यक्त केला. या वेळी अधिवक्ता आशिष शेलार म्हणाले, ‘‘वर्षापूर्वी आघाडी सरकारच्या काळात पालघर येथे साधूंची हत्या झाली. तत्कालीन राज्य सरकारने ठोस कारवाई न केल्यामुळे हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे द्यावे लागले. मुंबईमध्ये ‘फ्री काश्मीर’चा फलक दाखवणार्या मेहक प्रभू या युवतीवर गुन्हा नोंदवण्यासाठी जनतेकडून दबाव टाकावा लागला. सभा घेऊन ‘हिंदूंची मानसिकता सडकी आहे’, असे म्हणणार्या सर्जिल उस्मानी याच्यावरही कारवाई झाली नाही. श्रद्धा वालकर हिच्या तक्रारीवर कारवाई न होण्याविषयी पत्रकारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारल्यावर त्यांनी बोलायचे टाळले. हे सर्व प्रकार पहाता तक्रारीवर कारवाई करण्याविषयी पोलिसांवर दबाव असल्याची शंका येते.’’