कल्याण येथे सहस्रो भक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्याकडून पू. अरुण मोडक महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
ठाणे, २० डिसेंबर (वार्ता.) – कल्याण येथील सदगुरु श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे मठाधिपती श्री नवनीतानंद महाराज (पू. अरुण मोडक महाराज) यांचे १९ डिसेंबरला पहाटे पुणे-सातारा महामार्गावर सातारा शहरानजीक अपघातात निधन झाले.
२० डिसेंबर या दिवशी सकाळी कल्याण येथील मठाच्या परिसरात पू. महाराजांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यामध्ये सहस्रो भक्त, हिंदुत्वनिष्ठ नागरिक, संघटना आणि विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सायंकाळी पार्थिव कल्याण येथील मठात आणण्यात आले. त्या वेळी विविध जिल्ह्यांतून आलेल्या साधक बंधू-भगिनींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. या वेळी भजन आणि नामजप करण्यात येत होता. नंतर अंत्यविधी करण्यात आले. या मठामध्ये श्री नवनीतानंद महाराज (पू. अरुण मोडक महाराज) यांची समाधी बांधण्यात येणार असल्याचे मठातील उत्तरदायी व्यक्तींकडून सांगण्यात आले. पुढील १७ दिवस मठामध्ये भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.