धर्माचरणी आणि प्रेमळ स्वभाव असलेल्या सनातनच्या संत कोल्हापूर येथील पू. (श्रीमती) आशा भास्कर दर्भेआजी !
धर्माचरणी आणि प्रेमळ स्वभाव अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असलेल्या सनातनच्या ७१ व्या संत कोल्हापूर येथील पू. (श्रीमती) आशा भास्कर दर्भेआजी (वय ९३ वर्षे) !
सनातनच्या ७१ व्या संत पू. (श्रीमती) आशा दर्भेआजी यांची आंतरिक साधना अखंड चालू आहे. त्या संतपदी विराजमान झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले होते, ‘‘पू. आजी त्यांच्या जीवनात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया (स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं जाण्यासाठी सातत्याने मनाला स्वयंसूचना देऊन केलेले प्रयत्न) प्रत्यक्ष जगल्या आहेत.’’ यातून मूळचीच सात्त्विक वृत्ती असलेल्या पू. आजींनी आपल्या प्रेमळ आणि सोशिक स्वभावाने संसारातील कष्टमय काळाला ‘कशा स्थिरतेने तोंड दिले असावे’, हे लक्षात येते.
पू. आजींची नात (पू. आजींची मुलगी श्रीमती अंजली कुलकर्णी यांची मुलगी) अश्विनी कुलकर्णी यांनी उलगडलेला पू. आजींचा साधनाप्रवास येथे दिला आहे.
२०.१२.२०२२ या दिवशी या साधनाप्रवासाचा पहिला भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
भाग २
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/637639.html
६. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार पू. आजींची चालू झालेली साधना !
६ अ. आतून अखंड नामजप चालू असणे : वर्ष २००० मध्ये माझी आई सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागली. लगेच पू. आजींनीही आईला विचारून कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करायला आरंभ केला. पू. आजी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजपही करतात आणि तो विशिष्ट चालीत म्हणतात. त्यांचा नामजप आतून आणि अखंड चालू असतो.
६ आ. २९.८.२०१७ या दिवशी कोल्हापूर येथे पू. आजींची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले.
६ इ. परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्कळ श्रद्धा असणे : साधनेच्या पहिल्या दिवसापासूनच पू. आजींच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ श्रद्धा निर्माण झाली. त्यामुळे पू. आजींना गुरुदेवांच्या भेटीची पुष्कळ ओढ लागून ‘त्यांचे दर्शन कधी होईल’, अशी तळमळ वाढली होती.
७. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगातील अविस्मरणीय क्षण
७ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी काव्यपंक्तीतून पू. आजी ‘संत’ असल्याचे लक्षात आणून देणे : पू. आजींची परात्पर गुरु डॉक्टरांशी भेट झाली आणि पू. आजींना पहाताच परात्पर गुरुदेवांनी गाण्याची एक ओळ म्हटली, ‘लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल का ?’ गुरुदेवांनी मला विचारले, ‘‘या कोण आहेत ?’’ तेव्हा मी गुरुदेवांना म्हणाले, ‘‘या माझ्या आजी आहेत आणि मी त्यांची सेवा ‘संत’ या भावाने करते.’’ गुरुदेव मला म्हणाले, ‘‘हो, त्या संत आहेत.’’ तेव्हा आमच्या लक्षात आले, ‘त्या काव्यपंक्तीतून गुरुदेवांना ‘आजी संत आहेत’, हे सांगायचे होते.
७ आ. संतपदप्राप्ती : ९.११.२०१७ या दिवशी रामनाथी आश्रम (गोवा) येथे पू. आजींना सनातनच्या ७१ व्या ‘संत’ म्हणून घोषित करण्यात आले.
७ इ. पू. आजींचे संतपद घोषित झाल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांचा लाभलेला सत्संग !
७ इ १. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पू. आजींचा भाव ! : पू. आजींना ‘संत’ म्हणून घोषित केल्यानंतर त्यांना परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला. त्या वेळी गुरुदेवांच्या आसंदीशेजारी पू. आजींसाठी आसंदी ठेवली होती. ते पाहून आजी म्हणाल्या, ‘‘मी इथे कशी बसू ? गुरुदेवांच्या शेजारी बसण्याची माझी योग्यता नाही. त्यांच्या कृपेमुळे आजचा दिवस लाभला आहे. ते किती श्रेष्ठ आहेत.’’
७ इ २. पू. आजींना भेटल्यावर गुरुदेवांनी त्यांना वाकून नमस्कार केला.
७ इ ३. पू. आजींनी सांगितलेल्या अनुभूती : सत्संगात पू. आजींनी त्यांना आलेल्या अनुभूती परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितल्या.
अ. ‘‘एकदा घरी मी बसून नामजप करत असतांना मला एका देवीचे दर्शन झाले; मात्र ‘ती देवी कोणती होती ?’, हे मला समजले नाही.
आ. एकदा सकाळी नामजप करत असतांना मला तुमचे (परात्पर गुरु डॉक्टरांचे) अमृत महोत्सवाच्या दिवशीचे श्रीकृष्ण रूपातील दर्शन झाले.’’
७ इ ४. पू. आजींनी दोन्ही अनुभूती सांगितल्यावर परात्पर गुरुदेव त्यांना म्हणाले, ‘‘आता देवता तुमच्या दर्शनाला येत आहेत !’’
८. पू. आजी संत घोषित झाल्यावर कुटुंबियांना कृतज्ञता वाटणे
पू. आजींची मुलगी श्रीमती अंजली कुलकर्णी यांना ‘संत आई’ आणि श्रीमती अंजली कुलकर्णी यांच्या मुलांना ‘संत आजी’ लाभली’, यासाठी पू. आजी अन् परात्पर गुरुदेव यांच्याप्रती अखंड कृतज्ञता वाटते.
९. भावाच्या मृत्यूनंतर पू. आजींनी काढलेले उद्गार !
माझा भाऊ आणि पू. आजींचा नातू (कै. अभिजित अनंत कुलकर्णी) याचे निधन झाल्यानंतर तिसर्या दिवशी पू. आजी त्याच्यासाठी दिवा ठेवला होता, त्या खोलीत गेल्या. दिव्याला नमस्कार करून त्या म्हणाल्या, ‘‘सारे प्रारब्ध भोगणे सोपे नाही. आता सारे भोगून तो पुढे गेला आहे.’’
१०. पू. आजींमध्ये जाणवलेले पालट
१० अ. शारीरिक पालट
१. पू. आजींच्या चेहर्यावरील सुरकुत्या न्यून झाल्या आहेत.
२. पू. आजींच्या केसांना पिवळसर सोनेरी छटा आली आहे.
३. पू. आजींच्या त्वचेची चकाकी वाढली असून त्यांची त्वचा लोण्यासारखी मऊ झाली आहे.
४. पू. आजींच्या पावलांचा रंग गुलाबी झाला आहे.
१० आ. आध्यात्मिक पालट
१. पू. आजींच्या स्वभावात पुष्कळ निरागसपणा आला आहे.
२. पू. आजी अत्यंत स्थिर झाल्या असून त्यांची अंतर्मुखता वाढली आहे. अनेक वेळा त्यांची दृष्टी शून्यात असते.
३. पू. आजींच्या साड्यांचा स्पर्श मऊ लागतो आणि साड्या पुष्कळ सात्त्विक वाटतात. त्या हातात घेतल्यावर चैतन्य मिळते.
११. पू. आजींचा कृतज्ञताभाव
पू. आजी सतत कृतज्ञताभावात असतात. ‘श्री गुरु माझ्यासाठी किती करतात. मी त्यांच्यासाठी काही करू शकत नाही’, असे त्या सतत म्हणतात. ‘जीवनातील सर्व कटू प्रसंगांत देव समवेत होता. ही सर्व परात्पर गुरुदेवांची कृपा असून ते सर्वांना सांभाळत आहेत,’ असेही त्या म्हणतात. (समाप्त)
– अश्विनी कुलकर्णी (पू. आजींची नात (मुलीची मुलगी)), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.९.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |