भारताला राज्यघटनेद्वारे हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
जयपूर येथील ‘ज्ञानम्’ महोत्सवात ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ परिसंवाद !
जयपूर (राजस्थान), २० डिसेंबर (वार्ता.) – भारत स्वयंभू हिंदु राष्ट्र आहे; परंतु विद्यमान व्यवस्थेत त्याला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून दर्जा कुठे आहे ? एखाद्याने डॉक्टरची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तो स्वाभाविक डॉक्टर असतो; परंतु त्याला अनुमतीपत्र घेतल्याविना ‘डॉक्टर’ म्हणून काम करता येत नाही. त्याचप्रमाणे राज्यघटनेद्वारे भारताला हिंदु राष्ट्र घोषित केल्याविना भारताला हिंदु राष्ट्र म्हणता येणार नाही. यासाठी जनजागृती, लोकप्रतिनिधींचे प्रबोधन आणि न्यायालयीन लढा अशा सर्व मार्गांनी संघर्ष करून भारताला राज्यघटनेद्वारे हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते येथे आयोजित ‘ज्ञानम्’ महोत्सवात ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ या परिसंवादात मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. परिसंवादाचे संचालन पत्रकार आणि हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले.
सौजन्य: CityLive
हिंदु राष्ट्रासाठी प्रत्येकाने रामवादी व्हावे ! – माजी आमदार ज्ञानदेव आहुजा
या वेळी प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि राजस्थानचे माजी आमदार श्री. ज्ञानदेव आहुजा म्हणाले की, हिंदु राष्ट्र म्हणजे रामराज्य. हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकाला आपल्याला ‘रामवादी’ बनवावे लागेल. रामवाद म्हणजे भारतीय संस्कृतीचा परंपरावाद आहे.
भारतीय राज्यघटनेमुळे हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्यास प्रतिबंध ! – चेतन राजहंस
धर्मनिरपेक्ष व्यवस्थेचे तोटे सांगतांना सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस म्हणाले की, भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद २८ द्वारे हिंदूंना शाळा आणि महाविद्यालय येथून धर्मशिक्षण देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, तर अनुच्छेद ३० मध्ये अल्पसंख्यांना घटनात्मक संरक्षण देऊन धार्मिक शिक्षण देण्यास शिक्षणसंस्थाने स्थापण्याची अनुमती दिली गेली आहे. त्यामुळे शिक्षण पूर्ण झालेला हिंदु नास्तिकतावादी बनतो, तर अल्पसंख्य व्यक्ती श्रद्धावान मुसलमान किंवा ख्रिस्ती बनतात. यासाठी भारतीय राज्यघटनेत सुधारणा आवश्यक आहे.