‘चित्तशुद्धी लवकर होण्यासाठी प्रत्येकाला कोणत्या योगमार्गाची साधना आवश्यक आहे ?’, हे लवकर ओळखता येण्यासंबंधीचे टप्पे !
१. प्रत्येक मनुष्याच्या मूलाधारचक्रात असलेल्या ‘ज्ञाना’मध्ये ईश्वरप्राप्तीचा विशिष्ट योगमार्ग दडलेला असणे
‘प्रत्येक मनुष्याच्या कुंडलिनीतील मूलाधारचक्रात ईश्वरी शक्तीचा वास असतो. त्यात ‘ज्ञान’ असते. हे ज्ञान ईश्वराने मनुष्याला दिलेली दैवी देणगी आहे. साधकाची साधना वृद्धींगत होते, तेव्हा हे ज्ञान जागृत होते. त्या ज्ञानातच ईश्वरीप्राप्तीचा विशिष्ट योगमार्ग दडलेला असतो. यासंबंधीचे ज्ञान साधकाला साधनेने स्वतःला होऊ शकते किंवा हे ज्ञान साधकाला करवून देण्यासाठी गुरूंची आवश्यकता भासते.
२. साधकाच्या साधनेने मूलाधारचक्रातील ‘ज्ञान’ जागृत होताच तो ईश्वरप्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या विशिष्ट योगमार्गाकडे आकर्षित होणे
साधकाची साधनावृद्धी होते. तेव्हा साधकाच्या मूलाधारचक्राच्या स्थानी असलेले सुप्त ज्ञान जागृत होते. त्या ज्ञानामुळे ईश्वरप्राप्तीसाठी आवश्यक असलेल्या योगमार्गाकडे साधक आकर्षित होतो, उदा. साधकाचा भक्तीयोग असल्यास त्याचे मन ‘देवाची उपासना किंवा नामस्मरण’ यांकडे आकर्षित होते, तर साधक ध्यानयोगी असल्यास तो ध्यानयोगाकडे आकर्षित होतो. त्या वेळी साधक असा विशिष्ट योगमार्ग जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.
३. साधकाला विशिष्ट योगमार्गाचे आकर्षण निर्माण झाल्यावर टप्पाटप्याने घडणारी पुढची प्रक्रिया
३ अ. मन साधनेत लवकर एकाग्र होणे : साधकाला विशिष्ट योगमार्गाचे आकर्षण निर्माण झाल्यावर तो त्या मार्गाने जातांना त्याचे मन त्या योगमार्गात लवकर एकाग्र होते.
३ आ. साधनेची ‘ओढ’ निर्माण होणे : साधकाचे मन विशिष्ट योगमार्गात एकाग्र होऊ लागले की, त्याला त्या योगमार्गाची ‘ओढ’ निर्माण होते.
३ इ. ईश्वरी तत्त्वाची अनुभूती लवकर येणे : साधकाला अनुकूल अशा विशिष्ट योगमार्गाची ओढ निर्माण झाली की, त्याला ईश्वरी तत्त्वाची अनुभूती लवकर येते.
त्यामुळे साधकाचे मन ज्या योगमार्गाकडे आकर्षिले जाते, त्यात लवकर एकाग्र होते, त्या योगमार्गाची ओढ लागते आणि त्याला अल्प कालावधीत ईश्वरी तत्त्वाची अनुभूती येते. तो साधकाचा ईश्वरप्राप्तीसाठी आवश्यक असलेला विशिष्ट योगमार्ग समजावा.
४. विशिष्ट योगमार्गातून आलेल्या अनुभूतींमुळे साधक चित्तशुद्धीसाठी प्रयत्नशील बनणे
साधकाला विशिष्ट योगमार्गातून अनुभूती येऊ लागल्या की, त्याला चित्तातील स्वभावदोष आणि अहं यांचे अडथळे दूर करण्याची तीव्र इच्छा निर्माण होते आणि तो त्यासाठी प्रयत्नशील बनतो.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.५.२०२२)
|