साधकांनो, ‘गुरुसेवा करतांना ‘दायित्व मिळावे’ असे वाटणे’, हे अहंचे लक्षण आहे’, हे लक्षात घेऊन स्वतःत सेवकभाव रुजण्यासाठी प्रयत्न करा !
१. ईश्वर जिवाला योग्य वेळी दायित्व देऊन त्याची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने करून घेत असणे
‘साधकांनी पुढाकार घेऊन तळमळीने गुरुसेवा केल्यास त्यांच्यात समष्टी गुण निर्माण होण्यास साहाय्य होते. जिवामध्ये दायित्व घेण्यासाठी आवश्यक गुण निर्माण झाल्यावर ईश्वर त्या जिवाला योग्य वेळी दायित्व देऊन त्याची पुढील आध्यात्मिक उन्नती जलद गतीने करून घेत असतो.
२. साधकांच्या मनात सेवेचे दायित्व मिळण्याच्या संदर्भात विचार येत असल्यास त्यांनी ‘माझ्या प्रगतीसाठी जे आवश्यक आहे, ते देव उत्तरदायी साधकांच्या माध्यमातून मला देत आहे’, असा दृष्टीकोन ठेवावा !
‘पुढाकार घेऊन गुरुसेवेचे दायित्व घेणे’, हे समष्टी गुणवृद्धीचे लक्षण आहे. काही साधकांच्या मनात ‘मला दायित्वाची सेवा मिळायला हवी, तसेच एखादी दायित्वाची सेवा संबंधित साधकांपेक्षा मी अधिक योग्य प्रकारे करू शकतो’, असे विचार येतात. हे अहंचे विचार असून ते साधकांच्या साधनेमध्ये अडथळा निर्माण करतात. साधनेत स्वेच्छेपेक्षा ईश्वरेच्छेला अधिक महत्त्व आहे. ‘माझ्या प्रगतीसाठी जे आवश्यक आहे, ते देव उत्तरदायी साधकांच्या माध्यमातून मला देत आहे’, असा दृष्टीकोन ठेवून या विचारांवर मात करावी. या विचारांची तीव्रता अधिक असल्यास उत्तरदायी साधकांशी बोलून त्यावर स्वयंसूचना द्याव्यात.
३. साधकांनो, स्वेच्छेचा त्याग करून ईश्वरच्छेने गुरुसेवा करण्यातील आनंद अनुभवा !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१२.२०२२)