पिंपळेगुरव (पुणे) येथील रस्त्याचे काम निकृष्ट केल्याप्रकरणी अभियंत्यासह चौघांच्या विभागीय चौकशीचे आदेश !
पिंपरी (पुणे) – पिंपळेगुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय ते नर्मदा गार्डन या रस्त्याचे काम ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे होत असतांना नियंत्रण आणि पर्यवेक्षण न ठेवल्याचा ठपका ठेवत स्थापत्य विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अनिल राऊत, उपअभियंता विजयसिंह भोसले अन् कनिष्ठ अभियंता सचिन सानप, सचिन मगर या ४ जणांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त शेखरसिंह यांनी दिले आहेत.
रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर ४८ घंट्यांच्या आत ‘ग्रो कटिंग’ न करणे, निविदाच्या मानांकापेक्षा अल्प दर्जाचे काँक्रीट वापरणे, रस्त्याचे देखभाल करण्याचे दायित्व असतांना ते काम वेळेत न करणे असा अहवाल एक सदस्यीय समितीने महापालिकेला सादर केला आहे. या अहवालामध्ये अधिकार्यांनी सचोटीने, कर्तव्यनिष्ठेने कामकाज न करता अक्षम्य दिरंगाई आणि दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होते. रस्त्याच्या कामावर प्रभावी नियंत्रण आणि पर्यवेक्षण न ठेवल्याने ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम करून पालिकेची आर्थिक फसवणूक केली असल्याचा निष्कर्ष समितीने दिला आहे.
संपादकीय भूमिकाठेकेदारावर लक्ष ठेवून त्यांच्याकडून योग्य दर्जाचे काम करून न घेणारे अधिकारी दोषी आहेत. रस्त्याचे काम निकृष्ट केल्यामुळे चौकशीचे आदेश देण्यासमवेत यामध्ये दोषी असणार्यांना कठोर शिक्षा लवकर द्यावी, अशी अपेक्षा ! |