परिपूर्णतेचे मूर्तीमंत स्वरूप असणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सहवासात सेवा करतांना श्री. राहुल कुलकर्णी यांना शिकायला मिळालेली सूत्रे
परात्पर गुरुदेव डॉ. आठवले म्हणजे परिपूर्णता आणि प्रीती यांचे मूर्तीमंत स्वरूपच ! सर्वज्ञ असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांनी स्पर्श केला नाही, असा कोणताही विषय नाही. अवतारत्वाला मानवी देहाच्या मर्यादांचे बंधन असूनही जवळजवळ सर्वच क्षेत्रांत, म्हणजे बांधकामापासून ते संगीतापर्यंत प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या सर्वज्ञतेचा ठसा उमटवला आहे. साधकांना अपूर्णतेची जाण करून देऊन आणि त्यांना पूर्णत्वाचा ध्यास लावून प्रत्येक कृती परिपूर्ण करायला प्रोत्साहित करणारे अन् वेळप्रसंगी स्वतःच्या कृतीतून शिकवणारे परात्पर गुरुदेव यांच्याप्रती किती कृतज्ञतापुष्पे अर्पण करावीत ! स्वतः सतत शिकण्याच्या भूमिकेत राहून साधकांना साधनेचे बारकावे शिकवून परिपूर्णतेकडे नेणार्या परात्पर गुरुदेवांच्या संदर्भात ‘कृतज्ञता’ हा शब्दही थिटाच पडेल. साधकांचे ईश्वरप्राप्तीचे व्यष्टी ध्येय आणि हिंदु राष्ट्र-स्थापनेचे समष्टी ध्येय ही किती परस्परपूरक ध्येये आहेत, हेही इथे लक्षात येते. १९ डिसेंबर या दिवशी वर्ष २००३ मध्ये मिरज आश्रमाच्या बांधकामासंदर्भातील सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.
भाग २.
भाग १. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/637381.html
२. वर्ष २००५ (रामनाथी आश्रमाच्या बांधकामाच्या संदर्भातील सूत्रे)
२ अ. प.पू. डॉक्टरांनी झाडे तोडण्यापूर्वी झाडांवर रहात असलेल्या शक्तींना प्रार्थना करायला सांगणे
२००५-२००६ या वर्षी रामनाथी आश्रमाच्या शेजारील रस्त्याचे काम चालू होते. त्या कामाचा अनुभव असलेले एक साधक रस्त्याच्या कामावर देखरेखीचे काम (सुपरव्हिजन) करत होते. कामाच्या दुसर्या दिवशी त्यांच्या पायाला सूज आली. तो सुजलेला पाय त्या साधकांनी प.पू. डॉक्टरांना दाखवल्यावर प.पू. डॉक्टर त्यांना म्हणाले, ‘‘रस्त्याचे काम करतांना झाडे तोडण्यापूर्वी झाडांवर रहात असलेल्या शक्तींना प्रार्थना करायला हवी. नाहीतर, कुणीही स्वतःचे घर पडत असल्यावर रागावणारच.’’
२ आ. अपूर्ण बांधकामाच्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यावरून साहित्य नेण्यासाठी लाकडी फळ्यांचा पूल बांधणार्या साधकाचे कौतुक करणे
रामनाथी आश्रमाच्या बांधकामाच्या वेळी तिसरा मजला ते कलामंदिराची भिंत यांमध्ये एक मोठा खड्डा होता. तेथील बांधकाम अपूर्ण होते. तेथून कामगारांना साहित्य घेऊन जाण्याच्या दृष्टीने सोयीचे व्हावे, यासाठी श्री. घनश्याम गावडे यांनी लाकडी फळ्यांचा एक पूल बांधला होता. प.पू. डॉक्टरांनी मला विचारले, ‘‘हा पूल कुणी बांधला ?’’ मी ‘घनश्याम’चे नाव सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘बांधकाम विभागातील घनश्याम ‘परिपूर्ण असा साधक’ आहे.’’
२ इ. ‘प्रत्येक कृती स्थुलातूनही चांगली असावी’, असे प.पू. डॉक्टरांनी सांगणे
रामनाथी आश्रमातील पहिल्या माळ्यावरील मार्गिकेत कोटा लादी लावली होती. त्यांपैकी एक लादी गडद काळ्या रंगाची होती आणि ती इतर लाद्यांपेक्षा वेगळी दिसत होती. प.पू. डॉक्टरांनी ती काढायला सांगितली आणि म्हणाले, ‘‘स्थुलातील कळत नाही, तर सूक्ष्मातील काय कळणार ?’’
२ ई. इतरांना सिद्ध करणे, ही चांगली साधना असल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगणे
आश्रमाच्या दुसर्या मजल्याच्या स्लॅबचे काम चालू असतांना प.पू. डॉक्टरांनी ते काम करणारे साधक श्री. पाडळेकाका यांना विचारले, ‘‘तुम्ही कुणाला हे काम शिकवलेत कि नाही ? कुणाला सिद्ध केलेत कि नाही ? इतरांना सिद्ध करणे, ही चांगली साधना आहे. ’’ त्या वेळी श्री. पाडळेकाकांनी सांगितले, ‘‘राहुल कुलकर्णी आणि श्री. संभाजी माने यांना सिद्ध केले आहे.’’ हे ऐकून प.पू. डॉक्टरांना आनंद झाला.
३. अन्य सूत्रे
३ अ. साधकांच्या झोपेची काळजी घेणारी वात्सल्यमूर्ती प.पू. डॉक्टर !
१. वर्ष २००३ मध्ये मिरज आश्रमामध्ये मुद्रणालयात जाणारे साधक रात्री आश्रमात आल्यावर जिन्यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेमध्ये झोपलेले असत. प.पू. डॉक्टर सकाळी जिन्याच्या पायर्या चढतांना त्यांच्या चपलेचा किंवा पावलांचा मुळीच आवाज होऊ देत नसत. ते साधकांच्या झोपेची काळजी घेत.
२. वर्ष २००५ मध्ये रामनाथी आश्रमात साधक स्वागत कक्षाच्या हॉलमध्ये झोपत असत. त्यांना थंडी वाजू नये; म्हणून प.पू. डॉक्टरांनी रात्री खिडक्या बंद ठेवायला सांगितल्या.
३ आ. साधकाला मार्गदर्शन करून चिंतामुक्त करणारी प्रेमळ गुरुमाऊली !
३ आ १. प.पू. डॉक्टरांनी साधकाला इतरांकडून घेतलेल्या पैशांची याच जन्मात परतफेड करण्यास सांगणे : डिसेंबर २००५ या वर्षी मी प.पू. डॉक्टरांना विचारले, ‘‘मी घरी गेल्यावर पूर्वी मी केलेल्या कामातील काही जणांचे अधिक पैसे माझ्याकडे आल्याचे आठवून मला वाईट वाटते, तर त्याविषयी काही प्रायश्चित्त घेऊ शकतो का ?’’ यावर ते मला म्हणाले, ‘‘त्याला काही प्रायश्चित्त नाही; कारण तू कुणाकुणाचे देणे आहेस, त्याची नोंद तुझ्या अंतर्मनामध्ये झालेली आहे. त्यासाठी ज्यांचे देणे असशील त्यांना नेऊन दे.’’
३ आ २. प.पू. डॉक्टरांनी उदबत्ती भिजवून लावण्यास नकार देऊन त्याचे कारणही सांगणे
२००५ या वर्षी एकदा मी प.पू. डॉक्टरांना विचारले, ‘‘उदबत्ती भिजवून लावल्यावर ती अधिक वेळ जळत रहाते. तेव्हा मी तसे करू शकतो का ?’’ यावर त्यांनी मला सांगितले, ‘‘नको; कारण पंचमहाभूतांचा एकत्रित असा परिणाम नकारात्मक रितीने वातावरणावर होतो.’’
३ आ ३. प.पू. डॉक्टरांनी साधकाला आलेल्या रागाचे मूळ त्याच्या स्वभावदोषात असल्याचे सांगणे
वर्ष २००५ मध्ये एका साधकाने मला मिळत असलेल्या ज्ञानासंदर्भात ‘‘ते ज्ञान मोठी अनिष्ट शक्ती देतो’’, असे म्हटले. तेव्हा मला त्याचा राग आला. मी हे प.पू. डॉक्टरांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘यावर स्वयंसूचना दे. तुझ्या रागाचे मूळ तुझ्यातच आहे.
(क्रमश:)
– श्री. राहुल कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.८.२०२०)
भाग ३. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/638061.html
|