धार्मिक स्थळांसह कुठेच भ्रष्टाचार नको !
सध्या सामाजिक माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित होत आहे. त्यामध्ये शाळेतील मुलांना सहलीसाठी घेऊन जाणार्या बसचालकाला तेथील काही लोक स्थानिक कराच्या नावाखाली पैसे मागत आहेत. बसचालक त्याविषयी त्यांना विचारत असतांना ते लोक व्हिडिओ काढू नको; म्हणून बसचालकाला धमकावत आहेत. सध्या असे प्रकार धार्मिक, तसेच पर्यटन स्थळांवर सर्रास पहायला मिळतात. लांबून दर्शनासाठी आलेले भाविक त्याविषयी काही न बोलता वाद नको; म्हणून पार्किंगसाठी किंवा इतर वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे देतात. लवकर दर्शन व्हावे; म्हणून अनेक सरकारीकरण झालेली मंदिरे भाविकांकडून त्यासाठी अवाच्या सवा पैसे आकारतात. या सर्वांमधून मंदिरांचे पावित्र्य नष्ट होत असतेच, त्याही पुढे जाऊन मंदिरे ही पैसे कमावण्याचे साधन म्हणून काही निधर्मी भ्रष्टाचारही करत आहेत. या निधर्मी लोकांना आपण हे महापाप करत आहोत, याची काहीच भीती राहिलेली नाही, हे संतापजनक आणि दुर्दैवी आहे. याला आळा घालण्यासाठी भाविकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
आपण मंदिरांमध्ये का जातो ? तर संसाराच्या रहाटगाडग्यामधून काही वेळ का होईना मनःशांती मिळावी. देवाला अनुभवावे, देवाला आपल्या मनातील सुख-दुःख सांगावे, जेणेकरून दुःखे सहन करतांना ती भोगण्याची शक्ती देव देईल; परंतु मंदिराच्या आवारात प्रवेश करताच अशासकीय कराचे पैसे मोजावे लागत असतील, तर हे अयोग्य आहे. हे कर स्थानिक गुंडांनी स्वतःचे कमाईचे साधन; म्हणून निर्माण केलेले आहे. त्यांना कुठे तरी राजकीय आश्रय असल्याविना त्यांचे इतके धाडस वाढणार नाही, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? त्यामुळे सरकारने यामध्ये लक्ष घालून ते कसे बंद होईल, हे पहायला हवे.
काही तीर्थक्षेत्री असे प्रकार घडत असतांना शेगावचे गजानन महाराज संस्थान मात्र याला अपवाद आहे. अन्य देवस्थानांनी त्यांचा आदर्श घ्यावा. यातून एक भाग प्रकर्षाने अधोरेखित होतो, तो म्हणजे मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणून मंदिरे लवकरात लवकर सरकारीकरणातून मुक्त करून संत-महंत यांच्या अधिपत्याखाली यावीत. तसेच सरकारने लक्ष घालून भाविकांना त्रास देणार्या गावगुंडांवर वचक बसवावा, हीच भाविकांची अपेक्षा ! हिंदु राष्ट्रात अशा प्रकारे मंदिरांमध्ये कोणताही कर घेतला जाणार नाही, हे नक्की !
– श्री. जयेश बोरसे, पुणे