धर्माचरणी आणि प्रेमळ स्वभाव असलेल्या सनातनच्या संत कोल्हापूर येथील पू. (श्रीमती) आशा भास्कर दर्भेआजी !
धर्माचरणी आणि प्रेमळ स्वभाव अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असलेल्या सनातनच्या ७१ व्या संत कोल्हापूर येथील पू. (श्रीमती) आशा भास्कर दर्भेआजी (वय ९३ वर्षे) !
सनातनच्या ७१ व्या संत पू. (श्रीमती) आशा दर्भेआजी यांची आंतरिक साधना अखंड चालू आहे. त्या संतपदी विराजमान झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले होते, ‘‘पू. आजी त्यांच्या जीवनात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया (स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं जाण्यासाठी सातत्याने मनाला स्वयंसूचना देऊन केलेले प्रयत्न) प्रत्यक्ष जगल्या आहेत.’’ यातून मूळचीच सात्त्विक वृत्ती असलेल्या पू. आजींनी आपल्या प्रेमळ आणि सोशिक स्वभावाने संसारातील कष्टमय काळाला ‘कशा स्थिरतेने तोंड दिले असावे’, हे लक्षात येते. पू. आजींची नात (पू. आजींची मुलगी श्रीमती अंजली कुलकर्णी यांची मुलगी) अश्विनी कुलकर्णी यांनी उलगडलेला पू. आजींचा साधनाप्रवास पुढे दिला आहे.
भाग – १
१. पू. आजींचे वैयक्तिक जीवन
१ अ. जन्म आणि जन्मस्थळ : ‘भाद्रपद शुक्ल सप्तमी (३०.८.१९३०) या दिवशी पू. आशा दर्भेआजी यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील सोनी या गावी झाला.
१ आ. बालपण
१ आ १. प्रेमळ स्वभाव : पू. आजी सर्व भावंडांत मोठ्या होत्या. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ असल्याने त्यांनी आपल्या लहान भावंडांचा प्रेमाने सांभाळ केला. त्यांच्या लहान भावाला ‘देवी’ आल्या होत्या. तेव्हा त्यांनी त्याची सर्व सेवाशुश्रूषा केली.
१ आ २. कुटुंबातील वातावरण धार्मिक असल्याने देवाधर्माची आवड निर्माण होणे : कुटुंबातील वातावरण धार्मिक असल्यामुळे पू. आजींना लहानपणापासूनच धार्मिक ग्रंथ आणि पोथी वाचनाची आवड होती. त्या गुरुचरित्राचे सार, रुक्मिणी स्वयंवर आणि अन्य आध्यात्मिक ग्रंथ यांचे वाचन करायच्या. त्या प्रतिदिन तुळशीला पाणी घालून देवपूजा करायच्या. देवपूजा करतांना त्या व्यंकटेशस्तोत्र म्हणायच्या. पू. आजींची शिवावर पुष्कळ श्रद्धा असल्याने त्या प्रत्येक सोमवारी रेवणसिद्धनाथ मंदिरात जायच्या.
१ इ. भावंडांना सांभाळण्यासाठी नोकरी न करणे : पू. आजींचे जुन्या ७ वीपर्यंत शिक्षण झाले आहे. ७ वी उत्तीर्ण असल्याने त्यांना शिक्षिकेच्या नोकरीसाठी बोलावणे आले होते; मात्र भावंडांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी नोकरी स्वीकारली नाही.
१ ई. साधे आणि नीटनेटके रहाणीमान : पहिल्यापासूनच पू. आजींचे रहाणीमान अत्यंत सात्त्विक आहे. त्यांना स्वच्छ आणि टापटीपपणे रहायला आवडते. त्या नेहमी नऊवारी साडी नेसून केसांचा अंबाडा घालतात.
१ उ. धर्माचरण करणे : पू. आजी दैनंदिन जीवनातही हिंदु धर्मानुसार आचरण करतात. प्रसाधनगृहाचा वापर केल्यावर त्या केवळ हात-पाय न धुता चूळ भरतात आणि डोळ्यांना पाणी लावतात. त्या सांगतात, ‘‘यामुळे आपले चित्त शुद्ध होते.’’
२. पू. आजी देवघरात देवपूजा करत असतांना खोलीच्या दारात मोठा नाग येणे; पण तो खोलीत न येता उंबर्यावरून निघून जाणे
एक दिवस पू. आजी आणि माझी आई (पू. आजींची मुलगी श्रीमती अंजली कुलकर्णी, तेव्हा ती लहान होती.) देवघरात पूजा करत असतांना त्या खोलीच्या दारात एक मोठा नाग आला आणि उंबर्यावर फणा काढून बसला. त्यामुळे पू. आजी आणि आई यांना खोलीच्या बाहेर जाता येईना. तो नाग खोलीत आला असता, तरी धोका होता. देवाच्या कृपेने त्या नागाने केवळ खोलीत पाहिले आणि तो काही न करता निघून गेला.
३. मनात कटूता न ठेवता सासरी सर्वांशी प्रेमाने वागणार्या पू. आजी !
पू. आजींना त्यांच्या सासरी अत्यंत कष्टमय स्थितीत रहावे लागले. त्यांना कुटुंबियांनी त्रास दिला, तरी त्यांनी आपल्या कर्तव्यात कुठलीही कसूर केली नाही. सर्व जण त्यांच्याशी वाईट वागले, तरी पू. आजींनी सर्वांना प्रेम दिले. पू. आजी प्रतिकूल परिस्थितीतही देवावर श्रद्धा ठेवून परिस्थिती स्वीकारून स्थिर रहातात.
४. श्रद्धाळू स्वभाव
पू. आजी पहिल्यापासून पुष्कळ श्रद्धाळू आहेत. त्यांनी वेगळी साधना किंवा उपासना केली नाही; पण त्या पूजापाठ आणि स्तोत्रपठण नियमित करायच्या. त्या प्रतिदिन त्यांच्या गावातील (खटाव (जिल्हा सातारा) येथील) श्री लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात काकड आरतीला जायच्या. ते मंदिर त्यांच्या घरापासून ५ – ६ कि.मी. दूर होते.
५. पू. आजी पू. गोविंद उपळेकर महाराज यांना भेटायला गेल्यावर त्यांची गाठ न पडणे आणि त्या येऊन गेल्याचे कळल्यावर महाराजांनी घरी जाऊन पू. आजींना नमस्कार करून त्यांचे कौतुक करणे
पू. आजी ३१ – ३२ वर्षांच्या असतांना फलटण येथे त्यांच्या मावस बहिणीकडे गेल्या होत्या. तिथे त्या मावस बहिणीसह तेथील संत पू. गोविंद उपळेकर महाराज यांच्या दर्शनाला गेल्या होत्या; परंतु महाराज नसल्यामुळे त्यांना दर्शन झाले नाही. नंतर त्या दोघी घरी परत आल्या. पू. उपळेकर महाराजांना त्या दोघी येऊन गेल्याचे समजल्यावर ते भर दुपारी १२ वाजता २ कि.मी. दूर असलेल्या पू. आजींच्या मावस बहिणीच्या घरी अनवाणी चालत गेले आणि त्यांनी पू. आजींना वाकून नमस्कार केला. तिथे माझे आजोबा (पू. आजींचे यजमान श्री. भास्कर दर्भे) उभे होते. त्यांना उद्देशून पू. महाराज म्हणाले, ‘‘ती (पू. आजी) अतिशय सात्त्विक आणि सोशिक आहे. तिला का त्रास देतोस ?’’ (क्रमशः)
– अश्विनी कुलकर्णी (पू. आजींची नात (मुलीची मुलगी)), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.९.२०२२)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/637952.html