‘निर्गुण’ हा जप करतांना सौ. आनंदी पांगुळ यांना विविध अनुभूती येऊन चैतन्य मिळणे
‘६.५.२०२० ला रात्री ९.३० वाजता मी ‘निर्गुणा’चा जप करत होते. तेव्हा भगवंत मला विविध दृश्ये दाखवून विविध अवस्था अनुभवावयास देऊ लागला. याविषयी टंकलेखन करत असतांना मला परात्पर गुरु पांडे महाराज यांची आठवण झाली. मी ही अनुभूती त्यांना सांगितली असती, तर त्यांचे चैतन्यमय बोल कानी पडले असते आणि त्यांनी या दृश्यांचा मला आध्यात्मिक अर्थही सांगितला असता. या अनुभूतीमुळे मला मिळालेला आनंद समष्टीसाठी गुरुचरणी अर्पण करत आहे.
१. ‘निर्गुण’ शब्दाचा जप करतांना आलेल्या अनुभूती
१ अ. जप चालू होताच केशरी रंगाच्या निर्वात पोकळीत पोहत असल्याचे दृश्य दिसणे : मी ‘निर्गुणा’चा जप करू लागले. तेव्हा मी कुठेतरी पोहण्याची कृती करत असल्याचे मला जाणवले. माझ्या आजूबाजूला केशरी रंगाची निर्वात पोकळी होती. मी ‘बटरफ्लाय’ पद्धतीने (पोहण्याची एक पद्धत – यात दोन्ही हात पुढे घेऊन दोन्ही बाजूला पाणी ढकलायचे असते आणि दोन्ही पाय जवळ घेऊन पुन्हा लांब करत पाण्यातून पुढे जायचे असते.) त्या निर्वात पोकळीत पोहत होते. काही काळ अशा प्रकारे पोहल्यावर माझ्याभोवती असलेल्या पोकळीच्या रंगामध्ये पालट दिसू लागला. तिथे मला पोपटी-पिवळ्या रंगांचे तरंग दिसू लागले. त्यातून मी हळूहळू थोडी पुढे पुढे जाऊ लागले.
१ आ. स्वतःच्या ठिकाणी अंतराळविरासारखा पोषाख घातलेला पांढरा आकार दिसणे आणि आजूबाजूचे वातावरण गर्द निळे दिसू लागणे : मला माझ्या ठिकाणी अंतराळविरासारखा पोषाख घातलेली पांढरी आकृती दिसू लागली आणि आजूबाजूचे वातावरण गर्द निळे दिसू लागले. तिथून पुढे जातांना माझी कुठलीच हालचाल होत नव्हती; परंतु तरीही मी वरच्या दिशेने पुष्कळ गतीने पुढे जात होते.
१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पोहत प्रदक्षिणा घालणे
१ इ १. निर्गुण वातावरणात पांढरा सदरा परिधान केलेले परात्पर गुरु डॉ. आठवले दिसणे आणि त्यांच्यापर्यंत पोचल्यावर त्यांना प्रदक्षिणा घालणे : थोड्या कालावधीनंतर मला त्या निर्गुण वातावरणात पांढरा सदरा घातलेले परात्पर गुरु डॉ. आठवले दिसले. मी त्यांच्यापर्यंत पोचले आणि त्यांच्या उजवीकडून मागे जाऊन पुन्हा त्यांच्या पुढे येणे, अशा पद्धतीने प्रदक्षिणा घालू लागले.
१ इ २. फुलपाखराच्या (‘बटरफ्लाय’) पद्धतीने पोहत परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रदक्षिणा घालणे : आरंभी मी ‘बटरफ्लाय’ पद्धतीने पोहत परात्पर गुरु डॉक्टरांना प्रदक्षिणा घालत होते. त्यांच्या भोवतीचे वातावरण राखाडी रंगाचे दिसत होते. तेव्हा स्थुलातून मला पुष्कळ आनंद अनुभवता येत होता. मी त्यांच्या भोवती बराच वेळ अशा प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर किती वेळ झाला कळले नाही, पण माझ्या पोहण्याची पद्धत आपोआप पालटली.
१ इ ३. ‘फ्री स्टाईल’ पद्धतीने पोहत परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रदक्षिणा घालणे : त्यानंतर मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या भोवती ‘फ्री स्टाईल’ (पोहण्याची एक पद्धत – यात दोन्ही हात गोलाकार फिरवत पाणी मागे ढकलायचे असते आणि पायांच्या घोट्यांपासूनचा पावलाचा पुढील भाग हलवायचा असतो.) पद्धतीने पोहत प्रदक्षिणा घालू लागले होते. अगदी अल्प कालावधीत पुन्हा माझ्यात पालट झाला.
१ इ ४. त्यानंतर मला माशीसारखा आकार येऊन पारदर्शक पंख फुटले आणि मी अलगद उडत उडत परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रदक्षिणा घालू लागले.
१ इ ५. माशीचा आकार जाऊन पंख असलेल्या मनुष्याच्या आकारात प्रदक्षिणा घालणे : काही क्षणांत माझा माशीचा आकार जाऊन मला मी मनुष्यरूपात दिसू लागले; परंतु मनुष्यरूपातही मला त्या माशीसारखे पारदर्शक पंख होते. तेव्हा ‘निर्गुण’ असा जप करत माझे परात्पर गुरुदेवांना प्रदक्षिणा घालणे चालूच होते.
१ ई. स्वतः परी झाल्याचे दृश्य दिसणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या ठिकाणी काहीच अनुभवता न येऊन केवळ पांढरा प्रकाश दिसणे : काही क्षणांत माझा आकार पालटला. माझ्या अंगावर गुलाबी रंगाचा झगा, गुलाबी रंगाचे पारदर्शक पंख आणि हातात चांदणी असलेली एक लहानशी चंदेरी छडी अशा रूपात मी स्वतःला पाहिले. (मी लहानपणी परीचे चित्र असे काढायचे.) ‘मी पुष्कळ हलकी झाले आहे’, असे मला जाणवत होते. माझा चेहरा पालटलेला होता; परंतु मला वरील अनुभूतींप्रमाणे परात्पर गुरुदेवांभोवती कुठलेच वातावरण न दिसता त्यांच्या ठिकाणी केवळ एक पांढरा प्रकाश दिसत होता.
२. जप करतांना अल्पावधीत त्रासदायक शक्तीचे आवरण उणावल्याचे जाणवून उत्साह आणि आनंद जाणवणे
वरील दृश्य पहात असतांना अचानक सर्व थांबले आणि माझ्या लक्षात आले की, मी जपाला बसून केवळ १५ मिनिटेच झाली आहेत. या केवळ १५ मिनिटांत माझ्यावरील काळ्या (त्रासदायक) शक्तीचे आवरण पुष्कळ उणावले होते आणि मला उत्साह अन् आनंद जाणवत होता.
३. कृतज्ञता आणि प्रार्थना
वरील अनुभूती देऊन ‘निर्गुण’ जपामुळे घडलेली प्रक्रिया दाखवून विविध अवस्थांची अनुभूती दिल्याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘हे गुरुदेव, माझ्या अंतःकरणाची शुद्धी होऊन ही स्थिती मला सतत अनुभवता येऊ दे’, अशी आपल्या कोमल चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.’
– सौ. आनंदी रामचंद्र पांगुळ, गावभाग, सांगली. (६.५.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |