‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या धर्मांधाला २३ वर्षांची शिक्षा !
सातारा, १९ डिसेंबर (वार्ता.) – येथील खासगी शिकवणीचालक समीर बाबासाहेब मुजावर (वय ३८ वर्षे) याला मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्याच्या अंतर्गत २३ वर्षांची शिक्षा ठोठावली. वर्ष २०१८ मध्ये ‘लव्ह जिहाद’च्या घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.
१. समीर मुजावर हा शहरातील न्यू इंग्लिश स्कूल चौकात ‘परिवर्तन’ या नावाने खासगी शिकवणी घेत होता. पहिला विवाह झालेला असतांना आणि अपत्य असूनही मुजावर याने शिकवणीतीलच एका अल्पवयीन हिंदु मुलीला लग्नाचे आमीष दाखवून वर्ष २०१५ ते २०१७ या कालावधीत ठिकठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केले, तसेच पीडित मुलीला फूस लावून तिचे अपहरणही केले होते.
२. या मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवणे, तिचे अश्लील व्हिडीओ बनवल्याची धमकी देणे, असे प्रकार मुजावर याने केले.
३. वर्ष २०१७ मध्ये सातारा शहर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने आणि वर्ष २०१८ मध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्यात अत्याचारप्रकरणी पीडित मुलीने तक्रार केल्यानंतर स्वतंत्र दोन गुन्हे नोंदवण्यात आले होते.
४. नंतर शाहूपुरी येथील गुन्ह्यात तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे आणि शहर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये महिला फौजदार वर्षा डाळिंबकर यांनी अन्वेषण करून न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट केले होते. दोन्ही गुन्ह्यात एकच आरोपी असल्यामुळे या खटल्याची एकत्रित सुनावणी झाली.
५. सरकारी पक्षाच्या वतीने अधिवक्त्या मंजुषा तळवलकर यांनी काम पाहिले. सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधिशांनी आरोपी मुजावर याला दोन्ही गुन्ह्यात एकूण २३ वर्षे आणि ५७ सहस्र रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
६. दोन्ही घटनांमध्ये १४ साक्षीदारांनी नोंदवलेल्या साक्षीमुळे आरोपीला शिक्षा होण्यास साहाय्य झाले. आरोपीला त्याचवेळी अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.
हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पाठपुरावा केल्यामुळे गुन्हा नोंद झालाया प्रकरणात सातारा येथील विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु महासभा, हिंदु जनजागृती समिती आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्यांनी आरोपीवर गुन्हा नोंद होईपर्यंत पाठपुरावा घेतला. त्या वेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे पोलीस हवालदार धनंजय कुंभार आणि विश्वनाथ मेचकर, तसेच शहर पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे पोलीस नाईक राहुल खाडे अन् इतर पोलीस कर्मचारी यांचे चांगले साहाय्य लाभले. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन दप्तरी श्रीनिवास देशमुख यांनी आरोपी सुटणार नाही, अशा पद्धतीने आरोपपत्र सिद्ध केले. सरकारी पक्षाच्या वतीने अधिवक्त्या मंजुषा तळवलकर यांनीही स्वत:चे सर्व कौशल्य पणाला लावत आरोपीला अधिकाधिक शिक्षा होईल, असा युक्तीवाद केला. त्यामुळे सर्वच स्तरांतून पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि अधिवक्त्या मंजुषा तळवलकर यांचे कौतूक होत आहे. |