नक्षलवादाला घाबरून महाराष्ट्र थांबणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून धमकी !
नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड येथे चालू असलेल्या लोह-खनिज खाणीच्या विस्ताराचे काम बंद करावे, यासाठी येथील आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिली असल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी १९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली. यावर उत्तर देतांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवादाला घाबरून महाराष्ट्र थांबणार नाही. ‘धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षेची काळजी सरकार घेईल’, या शब्दांत विरोधकांना आश्वासित केले.
या वेळी अजित पवार यांनी सभागृहात मागणी केली की, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माओवादीच्या पश्चिम प्रभागातून हे धमकीचे पत्र आत्राम यांना पाठवण्यात आले आहे. धर्मराव बाबा आत्राम यांची सुरक्षा वाढवावी. त्यांच्यासह प्रशासकीय अधिकार्यांनाही सुरक्षा देण्यात यावी. यावर बोलतांना फडणवीस म्हणाले, ‘‘आमदार आत्राम यांना आलेल्या धमकीची शासनाने गंभीरपणे नोंद घेतली आहे. त्यांना सुरक्षा देण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक आणि गडचिरोलीचे पोलीस आयुक्त यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. सूरजागड येथील लोकखनिज प्रकल्पाचे काम बंद पाडण्यासाठी नक्षलवादी प्रयत्नरत आहेत. या प्रकल्पातून ४ सहस्र स्थानिकांना काम मिळाले आहे. या प्रकल्प बंद पाडण्यासाठी नक्षलवादी स्थानिक नागरिकांची दिशाभूल करत आहेत; मात्र हे काम थांबणार नाही. राज्यशासनाने या ठिकाणी २० सहस्र कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा केली आहे.’’
गडचिरोलीतील नक्षलवाद आता काही तालुक्यांपुरताच मर्यादित !
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद आता काही तालुक्यांपुरताच मर्यादित राहिला आहे. येथील तरुण आता नक्षलवादी दलामध्ये सहभागी होत नाहीत. त्यामुळे नक्षलवादी दलात सहभागी होण्यासाठी छत्तीसगड आणि ओरिसा येथून तरुणांना बोलवावे लागत आहे, अशी माहिती या वेळी फडणवीस यांनी सभागृहात दिली.