कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बोगस ट्वीटच्या मागे महाराष्ट्रातील राजकीय पक्ष ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील ज्या गावांमध्ये कर्नाटक राज्यात जाण्याचे ठराव करण्यात आले आहेत, त्यांच्यामागे कोणत्या पक्षाचे लोक आहेत, याची माहिती आम्हाला पोलिसांनी दिली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्या ‘बोगस ट्वीट’ मागेही कोणते राजकीय पक्ष आहेत, याची माहितीही आमच्याकडे असल्याचे नमूद करत महाराष्ट्रातीलच काही राजकीय पक्ष सीमावाद चिघळवत असल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर चालू असलेल्या दडपशाहीचे सूत्र उपस्थित करत ‘कर्नाटक सरकारची दडपशाही खपवून घेऊ नका’, असे आवाहन केले. यावर मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.
या वेळी ‘महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विविध शासकीय योजना बंद करण्यात आल्या. तेच पक्ष मराठी भाषिकांवरील अन्यायाविषयी बोलत आहेत. आम्ही सत्तेत आल्यावर या सर्व योजना पुन्हा चालू केल्या आहेत. सीमावादाच्या प्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी मराठी भाषिकांच्या मागे एकत्रित उभे रहायला हवे. सीमाप्रश्नावरून कुणीही राजकारण करू नये. राजकारणासाठी अन्यही सूत्रे आहेत’, असेही ते या वेळी मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.