पालघर येथे अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार, ८ आरोपींना अटक
ठाणे, १८ डिसेंबर (वार्ता.) – पालघर तालुक्यातील माहीम येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ८ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ८ तरुणांना सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली असून पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार चालू आहेत.
पालघर तालुक्यातील माहीम चौकी दूरक्षेत्रातील पालघर-माहीम रस्त्यावरील पाणेरी नदीजवळ एका निर्जन ठिकाणी ही घटना घडली. गर्दच्या आहारी गेलेले हे आरोपी माहीम, हनुमान पाडा, टेंभी, सफाळे, वडराई या भागांतील आहेत.
पालघर येथील अनेक समुद्रकिनार्यांवर दिवस मावळायला आला की, शुकशुकाट होतो. त्याचाच अपलाभ घेत इथल्या झुडपांमध्ये अनेक नशेखोर आश्रय घेतात. एकट्या व्यक्तीला गाठून त्यांची लुटमार करणे, महिलांची छेडछाड करणे, असे प्रकार येथे घडले आहेत. अशा हुल्लड नशेखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करत असतात; मात्र ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे नशेखोरांवर त्याचा काहीच परिणाम होतांना दिसत नाही. आता घडलेल्या प्रकारामुळे तरी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
संपादकीय भूमिकानिर्जन रस्त्यावरून महिलांना फिरणे असुरक्षित असणे, हे भारताला लाजिरवाणे ! एकेकाळी ‘निर्जन रस्त्यावरून महिला सुरक्षितपणे फिरू शकत होत्या’, अशी भारताची ओळख पुन्हा कधी होणार ! |