सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या सान्निध्यात श्रीरामाचा नामजप करतांना सौ. अनुपमा जोशी यांना आलेल्या अनुभूती

१. नामजपाच्या वेळी सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांच्या गळ्यात हार दिसून त्या हारातून प्रक्षेपित होणारा गुलाबी रंगाचा प्रकाश त्यांच्या अंगरख्यावर पडून त्यांचा तोंडवळा पुष्कळ तेजस्वी दिसणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

‘मी रामनाथी आश्रमातील सभागृहात बसून श्रीरामाचा नामजप करत होते. नामजपाच्या वेळी माझ्यासमोर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ बसले होते. मला ‘त्यांच्या गळ्यात लाल फुलांचा हार आहे’, असे स्थूल डोळ्यांनी दिसत होते. (प्रत्यक्षात सद्गुरु गाडगीळ यांनी हार घातलेला नव्हता.) ‘त्या हारात कोणती फुले आहेत’, हे मला कळत नव्हते; पण ती वेगळीच फुले होती. ‘त्या हाराचा स्वतःचा असा प्रकाश आहे’, असे मला वाटत होते. त्या हाराच्या भोवती असलेला जवळ जवळ एक इंच जाडीचा फिकट गुलाबी रंगाचा प्रकाश सद्गुरु गाडगीळकाकांच्या सदर्‍यावर पडला होता. त्यामुळे त्यांचा तोंडवळा पुष्कळ तेजस्वी दिसत होता.

२. नामजप करतांना सद्गुरु (डॉ.) गाडगीळ यांच्या सदर्‍याच्या बाहीवर ‘बासरी वाजवणारा कृष्ण’ आणि ‘हातात धनुष्य घेऊन सिद्ध झालेला श्रीराम’ यांचे दर्शन होणे

सौ. अनुपमा जोशी

बुधवार, १.४.२०२० या दिवशी मी श्रीरामाचा नामजप करत असतांना आरंभी मला काहीच जाणवले नाही. त्यानंतर सद्गुरु (डॉ.) गाडगीळकाकांच्या डाव्या हाताच्या सदर्‍याच्या बाहीवर मागच्या बाजूने मला प्रथम लाडू हातात घेतलेला श्रीकृष्ण दिसला. नंतर काही वेळाने किशोरवयीन श्रीकृष्ण बासरी वाजवतांना दिसला. बासरी वाजवणारा कृष्ण मला बराच वेळ दिसत होता. नंतर मात्र हातात धनुष्य घेऊन सिद्ध झालेला श्रीराम दिसला. त्या वेळी मला पुष्कळ आनंद होत होता. मला प्रश्न पडला, ‘आरंभी श्रीकृष्ण आणि आता श्रीराम का दिसत आहे ?’ त्या वेळी ‘श्रीराम आणि श्रीकृष्ण हे विष्णूचेच अवतार आहेत. त्यामुळे असे दिसले असेल’, असा मी विचार केला.’

– सौ. अनुपमा जोशी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.५.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक