विधीमंडळ अधिवेशन वादळी होण्याची शक्यता !
|
श्री. सचिन कौलकर, प्रतिनिधी, नागपूर.
नागपूर – राज्यात कोरोनाची साथ असल्याने गेल्या २ वर्षांपासून येथे हिवाळी अधिवेशन झाले नव्हते. अखेर यंदा येथे १९ डिसेंबरपासून १५ दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. यंदाच्या अधिवेशनात महाराष्ट्रातील महापुरुषांचा सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केलेला अवमान, कर्नाटक सीमावाद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे वक्तव्य, शेतकर्यांच्या आत्महत्या, ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून झालेला वाद आणि राज्यभर लव्ह जिहादच्या विरोधात निघणारे मोर्चे अशा अनेक विषयांवरून अधिवेशनात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. वरील प्रश्नांवरून विरोधक आक्रमक झाले असून त्याचे पडसाद नक्कीच अधिवेशनात उमटतील. विरोधकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी शिंदे-भाजप सरकारच्या वतीने जोरदार सिद्धता करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर येथे पहिले अधिवेशन झाले होते. आता २ वर्षांनंतर राज्यात शिंदे-भाजप सरकारचे हे पूर्णवेळ होणारे पहिलेच अधिवेशन आहे. अधिवेशनाची सिद्धता पूर्ण झाली असून १८ डिसेंबर या दिवशी बहुतांश सर्व मंत्री आणि आमदार येथे आले आहेत. विधानभवन सचिवालयाचे कामकाजही चालू झाले आहे.
काही दिवसांपूर्वी पुणे येथे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. अशा घटना पुन्हा न घडण्यासाठी सर्व मंत्र्यांभोवती आणि त्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत, नांदेड आणि सोलापूर जिल्ह्यांतील काही गावांनी कर्नाटक, तेलंगाणा आणि गुजरात येथे जाण्याची चेतावणी दिली आहे. वेगळ्या विदर्भाची मागणीही होत आहे. या प्रश्नावरून या काळात आंदोलन होण्याची शक्यता आहे.