उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ सारखा कायदा व्हायला हवा ! – चित्रा वाघ, प्रदेशाध्यक्ष, भाजप
पिंपळेगुरव (जिल्हा पुणे) – लग्नाचे आमीष दाखवून धर्मांतर करण्याचे प्रकार महाराष्ट्रात चालू आहेत. निसर्गचक्र पुष्कळ वेगळे झाले आहे. मुली १२ आणि १४ व्या वर्षी वयात येत आहेत. १४ आणि १५ व्या वर्षी मुली गर्भवती होत आहेत, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे, तसेच मुलींना बळजोरीने पळवून नेणे, अशा मुलींच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या परिवाराच्या संरक्षणासाठी आपल्याकडे कोणताच कायदा नाही. उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ सारखा कायदा व्हायला हवा, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पिंपळेगुरव येथे पत्रकार परिषदेत केली आहे. भाजपच्या वतीने पिंपळेगुरव येथे शहरातील महिला आघाडीचा मेळावा घेण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
(सौजन्य : Loksatta)
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, बलात्कार किंवा महिला अत्याचार यांविषयी कायदे आहेत, तसेच शासकीय यंत्रणाही आहे; मात्र त्या घटनेनंतर पीडितेच्या जीवनात दुसर्या दिवसापासून लढाई चालू होते. तिचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सरकारच्या वतीने ‘मनाधैर्य योजना’ आहे. ३ ते ५ लाखांचे साहाय्य करण्यात येते. हे साहाय्य मिळवून देण्याची आवश्यकता आहे. तसेच महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणासाठी जलदगती न्यायालये चालू करावीत, स्वतंत्र न्यायालय असावे. पूजा चव्हाण प्रकरणात मी रस्त्यावर उतरून लढले. आता न्यायालयात कायदेशीर लढाई आहे, ती मी आताही न्यायालयात लढत आहे.