मुंबई भाजपकडून ‘माफी मागो’ आंदोलन !
देवता आणि महापुरुष यांच्या अवमानास्पद वक्तव्याचा विरोध
मुंबई, १७ डिसेंबर (वार्ता.) – ‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी क्षमा मागावी’, ‘पाकिस्तान हाय हाय’ अशा घोषणा देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी १७ डिसेंबर या दिवशी येथे ठिकठिकाणी रोष प्रकट करून निदर्शने केली. या आंदोलनात वारकरी दिंड्याही सहभागी झाल्या होत्या. हिंदु देवता आणि महापुरुष यांच्या विरोधात वारंवार अवमानास्पद वक्तव्य करणारे महाविकास आघाडीतील नेते, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करणारे शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) नेते संजय राऊत यांच्या विरोधात भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
हिंदू-देवदेवतां व महापुरूषांविरोधात अपमानास्पद वक्तव्य करणारे मविआचे नेते तसेच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपतर्फे मुंबई व महाराष्ट्रात माफी मांगो आंदोलन करण्यात येत आहे. @bjp4smum @Rajesh_Shirwadk pic.twitter.com/xcIQIalH02
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 17, 2022
या वेळी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेधही करण्यात आला. मुंबई येथील ६ विभागांतील भाजपचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मुंबई येथील कांदिवली रेल्वेस्थानक, अंधेरी पूर्व रेल्वेस्थानक, घाटकोपर पूर्व, दादर पूर्व रेल्वेस्थानक, भाजप प्रदेश कार्यालयाजवळ, स्वा. सावरकर पुतळा आणि विलेपार्ले या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत निदर्शने केली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, तसेच एकनाथ महाराज यांचा अवमान करणार्या अंधारे यांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.