संगणकीय निर्जीव वस्तूंशी संवाद साधतांना भावस्थितीत कु. अपाला औंधकर हिला शिकायला मिळालेली सूत्रे
१. संगणकाच्या कळफलकाचा(‘की-बोर्ड’चा) गुरुदेवांप्रती असणारा सेवाभाव !
‘एकदा संगणकीय सेवा करत असतांना मला संगणकाचा कळफलक (की-बोर्ड), मॉनिटर आणि ‘सीपीयू’ यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळाले. सेवा करतांना ‘मॉनिटर’ आणि ‘सीपीयू’ माझ्याशी संवाद साधू लागले. आरंभी कळफलक मला सूक्ष्मातून म्हणाला, ‘ताई, तू प्रतिदिन सूक्ष्मातून गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) सत्संगाला जातेस. त्या सत्संगाचा मलासुद्धा लाभ होत आहे. मला असे वाटते की, मी प्रत्यक्ष प.पू. गुरुदेवांच्याच सत्संगात बसलो आहे; कारण तू शिकायला मिळालेली सूत्रे लिहितेस आणि गुरुदेवांचे जे गुणगान करतेस, ते माझ्याच माध्यमातून करतेस.’
हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले. मी कळफलकाला म्हटले, ‘देवाने सेवेचे माध्यम करून तुला सात्त्विकता दिली आहे. त्याबद्दल तू कृतज्ञता व्यक्त कर. मला गुरुदेवांप्रती असलेला तुझा भाव शिकायला मिळाला; म्हणून मी तुझ्याप्रती कृतज्ञ आहे.’
२. ‘मॉनिटर’च्या पडद्याचे (‘स्क्रिन’चे) गुरुदेवांशी असलेले अनुसंधान पाहून ‘सेवेचा कर्तेपणा घ्यायला नको’, याची जाणीव होणे
मी ‘मॉनिटर’च्या पडद्याकडे (‘स्क्रिन’कडे) पाहिल्यावर तो आनंदाने मला म्हणाला, ‘ताई, तू माझ्याकडे पाहतांना ‘साक्षात् परात्पर गुरुदेवांचेच नेत्र मला पहात आहेत आणि त्यांच्या कृपादृष्टीचा मला लाभ होत आहे’, असे मला जाणवते.’ मला ‘मॉनिटर’च्या पडद्याकडून त्याचे गुरुदेवांशी असलेले अनुसंधान शिकायला मिळाले. यातून ‘बाह्यतः जरी माझा देह सेवा करतांना दिसत असला, तरी परात्पर गुरुदेवांच्या संकल्पामुळेच तो कार्यरत असतो; म्हणून मी कोणत्याही सेवेचा कर्तेपणा घ्यायला नको’, असे माझ्या लक्षात आले.
३. ‘सीपीयू’मधून ‘ॐ’ आणि ‘निर्विचार’ हे जप ऐकू येणे
नंतर मी ‘सीपीयू’कडे पाहिल्यावर तो काही बोलत नव्हता. मी त्याच्याजवळ गेले आणि कान देऊन ‘तो काही सांगत आहे का ?’, हे ऐकण्याचा प्रयत्न केला. मी लक्षपूर्वक ऐकल्यावर मला ‘सीपीयू’मधून ‘ॐ’ आणि ‘निर्विचार’ हे जप ऐकू आले.
त्या वेळी मला पुष्कळ आश्चर्य आणि कृतज्ञताही वाटली. ‘सीपीयू’ अंतर्मुख होऊन गुरुदेवांची सेवा भावपूर्ण होण्यासाठी नामजप करत आहे’, असे माझ्या लक्षात आले.
ही तिन्ही उपकरणे निर्जीव असूनही सतत देवाच्या अनुसंधानात असतात. माझ्यात ‘देवाशी अनुसंधान साधणे, शिकण्याची वृत्ती आणि कृतज्ञताभाव हे गुण वाढायला हवेत’, असे माझ्या लक्षात आले. ‘हे गुरुदेवा, आता तुमच्याच कृपाशीर्वादाने मला हे प्रयत्न कृतीत आणता येऊ देत’, अशी तुमच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना करते.’ (२९.१०.२०२१)
परात्पर गुरुदेवांची,
– कु. अपाला औंधकर, फोंडा, गोवा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |