परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आणि वय १५ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आर्तभावाने केलेली प्रार्थना !
‘एकदा मी परात्पर गुरु डॉक्टरांना आर्तभावाने प्रार्थना करत असतांना मला पुढील प्रार्थना सुचली. ‘हे गुरुदेवा, ‘मी साधनेचे प्रयत्न करावेत’, अशी तळमळ माझ्यापेक्षा तुम्हालाच अधिक आहे. त्यामुळे तुम्ही मला विविध प्रसंगांतून बाहेर काढून माझे प्रारब्ध भोग संपवत आहात. सेवेच्या माध्यमातून तुम्ही माझी साधना करून घेत आहात. ‘तुम्हाला अपेक्षित अशी साधना कशी करायला हवी ?’, हे माझ्या लक्षात येत नाही. मला केवळ तुमच्या चरणी ठेवा आणि गुरुसेवेमध्ये न्हाऊ घाला, ही प्रार्थना आहे.’
२. सेवा करतांना परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर त्यांचे अस्तित्व अनुभवणे
२ अ. सेवा करतांना सहसाधक समवेत नसतांना परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करणे : २८.१०.२०२१ या दिवशी मी सेवा करत होते. माझ्या समवेत सेवा करणारे सर्व साधक आपापल्या खोलीत गेले. तेव्हा मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘हे भगवंता, आता तुम्हीच माझ्या समवेत रहा. खरेतर तुम्ही सूक्ष्मातून माझ्या समवेत सतत आहात; परंतु मला तुमचे अस्तित्व अनुभवता येऊ दे. तुमच्याविना मी सेवा करू शकत नाही. त्यामुळे हे गुरुदेवा, तुम्ही या.’ मी प्रार्थना केल्यानंतर गुरुदेव मला सूक्ष्मातून म्हणाले, ‘आता आपण एकत्रच सेवा करू.’ गुरुदेवांच्या या एका वाक्याने मी पूर्णतः निश्चिंत होऊन सेवा करू लागले. सेवा करतांना मला कोणतेच भान नव्हते. मी गुरुदेवांचे स्मरण करत भावपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला पुढील अनुभूती आल्या.
२ आ. परात्पर गुरु डॉक्टरांचे स्मरण करत सेवा करतांना आलेल्या अनुभूती
१. ‘माझ्या शेजारील आसंदीवर साक्षात् परात्पर गुरु डॉक्टरच येऊन बसले आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले. त्या आसंदीच्या बाजूने ‘पुष्कळ तेज माझ्याकडे येत आहे’, असे मला जाणवले. परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवून माझी भावजागृती झाली.
२. मला मोगरा, चमेली आणि अन्य फुले यांचा सुगंध आला.’
– परात्पर गुरुदेवांची,
कु. अपाला औंधकर (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आणि वय १५ वर्षे), फोंडा, गोवा. (२९.१०.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |