धर्मांतर रोखण्याचा एक मूलभूत उपाय : धर्मशिक्षण !
गेल्या दीड सहस्र वर्षांपासून म्हणजे इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणांपासून (वर्ष ७१२ पासून) हिंदूंचे इस्लाम धर्मात आणि साधारण ब्रिटिशांच्या आक्रमणापासून (वर्ष १८०० पासून) हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर होण्यास आरंभ झाला. अर्थात् इस्लाममध्ये धर्मांतर हे तलवारीच्या बळावर बलपूर्वक आणि ख्रिस्ती धर्मात धर्मांतर हे आमिषे दाखवून झाले अन् होत आहे, हेही सर्वजण जाणतात. गोव्यात ‘इन्क्विझिशन’च्या (धर्मांतरासाठी पोर्तुगिजांनी हिंदूंचा अतिशय क्रूर पद्धतीने केलेला छळ) माध्यमातून पोर्तुगिजांनी क्रूरतेची परिसीमा गाठून हिंदूंचा छळ केला आणि दहशत निर्माण करून त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडले. डोळे फोडून, त्वचा सोलून, जीभ कापूनही अंतिमतः शिरच्छेद होईपर्यंत ज्यांनी धर्मांतर केले नाही, त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या अत्युच्च धर्माभिमानाचे मोठे उदाहरण आपल्याकडे आहे. ‘इन्क्विझिशन’च्या वेळी झालेल्या छळाच्या वेळीही गोव्यातील अनेक हिंदूंनी धर्मांतर केले नाही. ही उदाहरणे आपल्याकडे असतांनाच आज भारत देशाच्या विविध राज्यांत हिंदूंनी ख्रिस्ती आणि इस्लाम पंथ स्वीकारण्याची टक्केवारी मोठी आहे. वर्ष १९५१ मध्ये असणारी मुसलमानांची लोकसंख्या ९.८ टक्क्यांवरून वर्ष २०११ पर्यंत ती १४.२३ टक्के झाली होती, तर ख्रिस्त्यांची लोकसंख्या वर्ष १९५१ मध्ये २.०३ टक्क्यांवरून वर्ष २०११ पर्यंत २.३० टक्के झाली होती. पूर्वाेत्तर भारत ख्रिस्तीबहुल झाला आहे. धर्मांतराचे ताजे उदाहरण म्हणजे पंजाब राज्यात ६५ सहस्र पाद्र्यांनी राज्यातील सर्व २३ जिल्ह्यांमध्ये लाखो शिखांचे धर्मांतर केले आहे. गेल्या १४ वर्षांत ३ लाखांहून अधिक शीख आणि हिंदू यांचे धर्मांतर करण्यात आले आहे. अमृतसर आणि गुरदासपूर या २ जिल्ह्यांत ६०० ते ७०० चर्च आहेत. यांतील ६० ते ७० टक्के चर्च गेल्या ५ वर्षांत उभारण्यात आले आहेत.
आजच्या घडीलाही शैक्षणिक संस्था, चर्च, रुग्णालये, अन्य सेवाभावी संस्था यांच्या नावाखाली ख्रिस्त्यांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात छुपे धर्मांतर चालू आहे. जसे ते डोंगराळ आदिवासी भागांत आहे, तसे ते महानगरांतही आहे. जसे अगदी गरीब लोकांमध्ये आहे, तसेच एका अर्थाने आंग्लाळलेल्या अतीश्रीमंतांमध्येही ते वैचारिकदृष्ट्या झाले आहे. येथे लक्षात घेण्यासारखे सूत्र हे आहे की, धर्मांतर बलपूर्वक असो, फसवून केलेले असो अथवा अन्य पंथांच्या प्रथांचे आचरण असो (उदा. वाढदिवस साजरा करणे), एखाद्यात प्रखर धर्माभिमान असेल, तर त्याच्याकडून ते होण्याची शक्यता उणावते. ‘प्राण गेला तरी बेहत्तर; पण अखेरच्या श्वासापर्यंत मी धर्म सोडणार नाही’ एवढा धर्माभिमान हा धर्मशिक्षणाने आणि ते आचरणात आणून निर्माण झालेल्या आत्मबळानेच निर्माण होऊ शकतो.
(पूर्वार्ध)
१. धर्मशिक्षणाने धर्माचे महत्त्व लक्षात येते आणि धर्माभिमान निर्माण होतो !
धर्मशिक्षणाने धर्माचे महत्त्व लक्षात येते. धर्म म्हणजे काय ? मनुष्याचा जन्म कशासाठी झाला आहे ? त्याच्या जीवनाचा अंतिम उद्देश काय ? हे लक्षात येते. धर्मशिक्षणामुळे धर्माचे ज्ञान मिळते, त्यामुळे हिंदु धर्मात धर्माचरणाने युक्त अशी जी आदर्श जीवनपद्धत सांगितली आहे, त्याचे महत्त्व लक्षात येते (उदा. झोपेतून उठल्यावर मुखमार्जन, स्नान, वेशभूषा, केशभूषा आदी आचारधर्म, दिनचर्या, ऋतूचर्या, सण साजरे करण्याच्या वेळी करायचे धर्माचरण इत्यादी.) धर्मात सांगितल्यानुसार आचरण केल्याने समाधान, मनःशांती, सौख्य, आनंद लाभते, तसेच ईश्वरी तत्त्वाच्या अनुभूतीही येतात. हे सर्व अनुभवल्यामुळे पुन्हा धर्माचे महत्त्व अधिक प्रमाणात लक्षात येते आणि धर्माभिमान वृद्धींगत होण्यास साहाय्य होते. असे चक्र आहे. वरील सर्व प्रक्रिया होण्यासाठी मुळात धर्मशिक्षण मिळणे आवश्यक असते.
२. धर्मशिक्षणाच्या संदर्भात आजची स्थिती !
आजही मंदिराच्या बाहेर रांगाच्या रांगा पहायला मिळतात, म्हणजे बहुसंख्य हिंदू हे भाविक आणि आस्तिक आहेतच; परंतु तरीही धार्मिक कृतींमागील अपेक्षित असे शास्त्र किंवा महत्त्व त्यांच्या लक्षात आलेले असतेच असे नाही. सनातन हिंदु धर्मातील शास्त्र आणि त्याची महानता गेल्या २०० वर्र्षांत हिंदूंना शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवली न गेल्यामुळे अन् दुसरीकडे पाश्चात्त्य ख्रिस्ती संस्कृतीच्या प्रचंड प्रभावामुळे अपेक्षित असा धर्माभिमान हिंदूंमध्ये निर्माण झालेला नाही. आजही सहजरित्या बहुसंख्य हिंदू धर्मांतरित होण्यामागे किंवा त्यांनी पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्यामागे स्वधर्माभिमान नसणे, हे एक महत्त्वाचे कारण आहे. एकीकडे हिंदू मोठ्या प्रमाणात सण-उत्सव साजरे करत असले, तरी त्यात शिरलेल्या अपप्रकारांमुळे त्यातून मिळणार्या चैतन्यापासून ते वंचित रहात आहेत.
३. गुरुकुले बंद पाडून धर्मशिक्षण देण्याची परंपरा नष्ट करणारे इंग्रज !
मेकॉलेने त्याच्या वरिष्ठांना दिलेला अहवाल ब्रिटनच्या संसदेत वाचला गेला, त्या वेळी, म्हणजे वर्ष १८३५ मध्ये भारतात ७ लाख २३ सहस्रांहून अधिक गुरुकुले अस्तित्वात असल्याचे पुरावे त्यात देण्यात आले होते. विशेष म्हणजे भारतात ८० ते ९० टक्के साक्षरता असल्याचे आणि चारही वर्णांतील मुले अन् मुली प्रचंड संख्येने गुरुकुलात शिक्षण घेत असल्याचेही त्यात नमूद केले होते. गुरुकुलांत साहजिकच धर्माचे आणि व्यवसाय कौशल्याचे शिक्षण मिळत होते. इंग्रजांनी जाणले होते की, ‘धर्म’ हा आत्मा असलेल्या भारतियांवर राज्य करणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी भारतियांच्या आत्म्यावरच आघात करण्यास आरंभ करायचे ठरवले आणि नियोजनबद्धरित्या ते कार्यवाहीत आणले. त्यांनी सर्वप्रथम गुरुकुले बंद केली आणि ‘भारतभर एकछत्री शिक्षण देणार’, असे सांगून कारकून निर्माण करणार्या शाळा उघडल्या. त्यामुळे भारतियांचे धर्मशिक्षण मिळण्याचे स्थानच नष्ट झाले.
४. धर्मशिक्षण नसल्यामुळे हिंदूंमध्ये धर्माभिमान नसणे !
गुरुकुले बंद झाल्यापासून अशा तर्हेने धर्मशिक्षण देण्याचे माध्यमच हिंदूंना उरले नाही. पुढील काही वर्षे, म्हणजे १९ व्या शतकात घरातून धर्माचरण होत असल्याने थोडा फार तरी धर्माभिमान टिकून होता; मात्र २० व्या शतकात एकीकडे भारतातील पिढ्या इंग्रजी शिक्षण घेऊ लागल्या, पाश्चात्त्य संस्कृतीचे आकर्षण वाढले आणि दुसरीकडे गुरुकुले बंद झाल्याने धर्मशिक्षण बंद पडले अन् इंग्रजी शिक्षण घेणारी पिढी निर्माण झाली. या पिढ्यांमधील काही बुद्धीवादी पाश्चात्त्यांच्या प्रभावामुळे घरातून दिल्या जाणार्या हिंदूंच्या धर्मशिक्षणाला ‘पुराणमतवादी’ समजू लागले. स्वातंत्र्यानंतर तर ‘हिंदूंचे जे जे काही, ते सर्व जुने, तुच्छ आणि पाश्चात्त्यांचे म्हणून जे जे काही आहे, ते सर्व महान’ अशा प्रकारची वैचारिकता आणि मानसिकता पत्रकारिता, साहित्य, कला आदी माध्यमांतून जाणीवपूर्वक पसरवण्यात आली अन् धर्माभिमान लोप पावलेल्या स्वातंत्र्यकालीन हिंदूंकडून ती कळत-नकळत जोपासली गेली. निधर्मी आणि साम्यवादी जणू मुसलमान अन् ख्रिस्ती यांचे मिंधे झाले आणि या सर्वांची अभद्र युती हिंदूंना त्यांच्या धर्मशिक्षणापासून वंचित ठेवण्यात यशस्वी ठरली !
(क्रमशः पुढच्या रविवारी)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/639166.html
– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.(१५.११.२०२२)