ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे अनमोल विचारधन
आज, १८.१२.२०२२ या दिवशी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…
१. ‘दुःख करणे किंवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे, तो माणूस प्रत्यक्ष दुःख भोगत असतांनाही आनंदात राहू शकेल.
२. आपले ज्याच्याशी साम्य आहे, त्याच्याशी आपली मैत्री जमते.
३. आपण देही असल्यामुळे आज आपला देव आपल्यासारखाच; पण त्याच्याही पलीकडे असणारा पाहिजे. अशा प्रकारचा देव म्हणजे सगुण मूर्ती होय.
४. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो योग्य मार्ग दाखवतो. आपण अंधारामध्ये वाट चालत असतांना एक क्षणभरच वीज चमकते; परंतु त्यामुळे आपल्याला पुढचा सगळा रस्ता दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले असता पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते.’
(साभार : मासिक ‘धार्मिक’, दीपावली विशेषांक २०१७)