नेपाळमधील निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाच्या पराभवामुळे चीनला धक्का
काठमांडू (नेपाळ) – नेपाळचे दोन माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि पुष्प कमल दहल प्रचंड यांचा समावेश असलेल्या नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाच्या निवडणुकीतील पराभवाने चीनला धक्का बसला आहे. २० नोव्हेंबर २०२२ या दिवशी ही निवडणूक झाली होती. यात नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाचा पराभव झाला. त्यामुळे नेपाळी काँग्रेस पक्षाचे नेते देउबा यांच्या नेतृत्वाखालील नवीन सत्ताधारी आघाडीला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली.
१. एका अहवालानुसार, नेपाळमधील हा पालट चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या एक मोठा धक्का आहे; कारण देउबा यांच्या नेतृत्वाखालील आघाडीत नेपाळमधील सत्तेची समीकरणे आता चीनऐवजी भारताकडे झुकतील. देउबा हे अमेरिकेचे विश्वासूही मानले जातात.
२. अमेरिकेसमवेत ‘मिलेनियम चॅलेंज कॉर्पोरेशन’ कराराचा पाठपुरावा करण्यासाठी देउबा यांनी साम्यवादी पक्षांशी कडवी झुंज दिली होती. नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा यांच्या नेतृत्वाखालील ५ पक्षांच्या युती सरकारने जुलै २०२१ मध्ये सत्ता स्थापन केल्यापासून चीनशी मर्यादित संबंध ठेवले आहेत. दुसरीकडे, चर्चा न करता सीमेवरील अतिक्रमणाचे सूत्र उपस्थित केल्याने चीन आधीच देउबा सरकारवर अप्रसन्न आहे.
३. २० नोव्हेंबर २०२२ या दिवशी तेथे पुन्हा झालेल्या निवडणुकीत ५३ जागांसह नेपाळी काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला. विरोधी कम्युनिस्ट पक्षाला ४२ जागा मिळाल्या. ‘के.पी. शर्मा ओली आणि पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या पराभवामुळे नेपाळमधील चीनचा हस्तक्षेप अल्प होईल’, असे बोलले जात आहे.