‘हिंदु जनजागृती समिती’च्या ऑनलाईन धर्मशिक्षणवर्गांत सांगितल्यानुसार साधना केल्यावर खोपोली (जिल्हा रायगड) येथील सौ. योगिता पाटील यांना निद्रानाश दूर झाल्याची आलेली अनुभूती
हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे, यासाठी ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने धर्मशिक्षणवर्गांचे आयोजन केले जाते. कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन धर्मशिक्षणवर्गांचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गांमुळे इतर संप्रदायांनुसार साधना करणार्या अनेक धर्मप्रेमींना योग्य साधना समजली. योग्य साधना केल्याने त्यांच्या जीवनात आमूलाग्र पालट झाले आणि अनेक अनुभूतीही आल्या. खोपोली (जिल्हा रायगड) येथील धर्मप्रेमी सौ. योगिता पाटील यांनी साधनेला आरंभ केल्यावर त्यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. अनेक वर्षांपासून ‘निद्रानाशा’चा त्रास होणे आणि दिवसा सतत झोप येऊन कुटुंबियांसाठी काही करता येत नसल्याने मनाला निराशा येणे
‘अनेक वर्षांपासून मला रात्री झोप लागत नव्हती. झोप न येण्याचा हा त्रास दूर व्हावा; म्हणून मी पुणे आणि मुंबई येथील अनेक मोठमोठ्या आधुनिक वैद्यांकडे जाऊन उपचार घेतले. रात्री झोप लागावी, यासाठी मी गोळ्या घ्यायचे आणि या गोळ्यांमुळे मला दिवसभर झोप येऊन झोपून रहावे लागायचे. यामुळे मुले आणि कुटुंबातील अन्य सदस्य यांच्यासाठी मी काहीच करू शकत नव्हते. या त्रासामुळे मला ‘माझा काहीच उपयोग नाही, मी माझे जीवन संपवून टाकावे’, असे निराशेचे विचार मनात यायचे.
२. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप १ घंटा केल्यावर पूर्वी न लागणारी झोप सहजपणे लागून सकाळी लवकर उठून घरची कामे करता येणे आणि याचे सर्वांना आश्चर्य वाटणे
दोन वर्षांपासून मी हिंदु जनजागृती समितीच्या ऑनलाईन धर्मशिक्षणवर्गात सहभागी होत आहे. या वर्गात मी झोप न येण्याची माझी समस्या सांगितली. त्या वेळी ‘झोप न लागणे’, ही समस्या ‘पूर्वजांच्या त्रासाचा भाग असून त्यासाठी दत्ताचा नामजप करायला हवा’, असे मला समजले. त्या दिवसापासून मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन एक घंटा श्रद्धेने करू लागले. हा नामजप चालू केल्यावर माझे झोपेच्या गोळ्या घेण्याचे प्रमाण न्यून झाले आणि मला झोपही लागू लागली. एक मासातच माझ्या झोपेच्या सर्व गोळ्या बंद होऊन मला छान झोप लागू लागली.
सकाळी लवकर उठता येत नसल्याने अनेक वर्षे इतरांना माझ्यासाठी स्वयंपाक करायला लागायचा. आता मी सर्वांसाठी स्वयंपाक करते. मी सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून यजमानांना डबाही देत आहे. ‘माझ्यात झालेला हा पालट म्हणजे एक मोठे आश्चर्य आहे’, असे माझे नातेवाईक आणि कुटुंबीय यांना वाटत आहे.
३. ‘हिंदु जनजागृती समिती’मुळे ‘नव्याने जन्म मिळाला आहे’, असे वाटणे
आजवर देवच ‘खरी आई’ असतो’, असे मी ऐकले होते. आता ‘हिंदु जनजागृती समिती’ हाच माझा देव असून मला देवाचे प्रेम अनुभवता येत आहे. ‘या देवाने मला नव्याने जन्म दिला आहे’, असे मला वाटत आहे.
४. धर्मशिक्षणवर्गात सांगितल्यानुसार ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलना’ची प्रक्रिया चालू केल्यावर आनंदात वाढ होणे
धर्मशिक्षणवर्गात येण्यापूर्वी ‘माझ्या सभोवती असणारी परिस्थिती आणि व्यक्ती यांच्यामुळे मी दुःखी आहे’, असे मला वाटायचे; पण वर्गामुळे ‘व्यक्तीला तिचे स्वभावदोष, तसेच अहं यांमुळेच दुःख होते’, हे मला समजले. ‘स्वतःचे स्वभावदोष कसे ओळखायचे ? आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया कशी करायची ?’, हे मला शिकायला मिळाले. आता मी ही प्रक्रिया नियमितपणे करत आहे आणि त्यामुळे माझ्या आनंदात वाढ होत आहे.
५. धर्मशिक्षणवर्गात मिळालेले ज्ञान इतरांना मिळावे, यासाठी सौ. योगिता पाटील यांनी केलेले प्रयत्न
अ. मी माझ्या भावाच्या घरी प्रवचन आयोजित केले. त्यातून योग्य साधना समजल्याने माझा भाऊ आणि वहिनीही कुलदेवता, तसेच दत्तगुरु यांचा नामजप करू लागले आहेत.
आ. माझी मोठी बहीणही साधना करू लागली असून तिच्या दोन्ही मुलीही नामजप करतात.
इ. माझ्यात झालेला चांगला पालट बघून माझे यजमान स्वतः धर्मशिक्षणवर्गात आले आणि त्यांनी साधना समजून घेतली. आता तेही साधना करू लागले आहेत. पूर्वी त्यांना नोकरीत आस्थापनातील काही प्रसंगांत ताण येत असे; पण कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करू लागल्यापासून आता ताण येत नाही.
ई. माझ्या दोन्ही मुलीही मनापासून नामजप करत आहेत आणि त्यांच्यात सकारात्मक पालट जाणवत आहेत.
धर्मशिक्षणवर्गामुळे मला योग्य साधना समजून माझ्यासह आणखी ४ कुटुंबेही योग्य साधना करू लागली आहेत. श्रीकृष्णाच्या या कृपेबद्दल त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. योगिता पाटील, खोपोली, रायगड. (२८.३.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमी यांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |