सेवाभावी आणि शिकण्याची अन् अभ्यासू वृत्ती असणारे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे फोंडा (गोवा) येथील श्री. प्रताप कापडिया (वय ७४ वर्षे) !
मार्गशीर्ष कृष्ण नवमी (१७.१२.२०२२) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. प्रताप कापडिया यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिका कु. कौमुदी जेवळीकर यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्री. प्रताप कापडिया यांना ७४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
१. काटकसरीपणा
‘पेन्सिल वापरून लहान झाल्यावर कापडियाकाका तिच्या मागच्या बाजूला पेनचे टोपण लावून ती अधिक दिवस वापरतात.
२. एकाग्रता
सेवा करत असतांना आजूबाजूला कितीही मोठा आवाज असला, तरी काकांची सेवेतील एकाग्रता भंग होत नाही. त्यांना दिलेली सेवा ते एकाग्रतेने पूर्ण करतात.
३. शिकण्याची वृत्ती
अ. एकदा आम्हाला स्वागतकक्षाची अंतर्गत रचना करायची होती. तेव्हा मी दुसर्या एका सेवेत खोलीच्या रचनेचे २ पर्याय काढले होते. त्यानंतर काकांनीही स्वागतकक्षाच्या रचनेतील २ पर्याय काढले आणि ते मला म्हणाले, ‘‘आपण दुसराही पर्याय काढू शकतो’, हे मी तुझ्याकडून शिकलो.’’
आ. आम्ही वास्तूशास्त्रानुसार इमारतीच्या बांधकामाचा आराखडा बनवतो. काकांसाठी हा विषय नवीन होता, तरीही त्यांनी स्वतःकडे न्यूनपणा घेऊन ते सर्व बारकावे शिकून घेतले. तसे पाहिले, तर काकांनी बरीच वर्षे वरिष्ठ वास्तूविशारद (सिनीअर आर्किटेक्ट) म्हणून काम केले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी नवीन विषय समजून घेऊन त्याप्रमाणे कृती करणे कठीण आहे, तरीही काका ते करतात. ते आम्हाला म्हणतात, ‘‘मला तुमच्यामुळे शिकायला मिळते.’’
४. अभ्यासू वृत्ती
एकदा काकांना अभ्यासासाठी जवळपास ४०० ते ५०० पानांची एक निविदा (टेंडर) वाचण्यासाठी दिली होते. ती वाचून त्यांना तिच्यातील सूत्रे काढायला सांगितली होती. काकांनी न कंटाळता ती निविदा संपूर्ण वाचली. ‘त्यात कसे असावे आणि कसे नसावे ? त्यांनी काय चांगले केले आणि त्यांचे काय चुकले ?’, हेसुद्धा त्यांनी सांगितले.
५. सेवाभाव
काकांना कोणतीही सेवा सांगितली, तरी त्यांची ती सेवा करण्याची सिद्धता असते. ‘ही सेवा नको’ किंवा ‘एखादी सेवा मला आवडली नाही’, असे काका कधीच म्हणत नाहीत. वयाने लहान असलेल्या साधकांनी दिलेली सेवाही काका मनापासून करतात.
६. स्थिरता
मी काकांना कधीच पुष्कळ आनंदी किंवा दुःखी पाहिले नाही. ते नेहमी मनाने स्थिर असतात.
‘परात्पर गुरु डॉक्टर, ‘मला काकांचे गुण आत्मसात करता येऊ दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना करते.’
– कु. कौमुदी जेवळीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१०.२०२२)