दर्जेदार रस्त्यांद्वारे राज्याची वेगळी ओळख निर्माण करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई – राज्यात रस्त्यांमुळे विविध शहरे जोडली जात आहेत. समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबईसह मोठ्या शहरांना जोडणार्या रस्त्यांच्या कामांना समंती देण्यात आली आहे. काही रस्ते प्रगती पथावर आहेत. दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. याद्वारे आम्ही राज्याची एक वेगळी ओळख निर्माण करणार आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहनिर्माण व्यावसायिकांच्या परिषदेत केले. दैनिक ‘लोकसत्ता’च्या वतीने सेंट रेजिस हॉटेल येथे ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
#LIVE : #लोकसत्ता च्या वतीने आयोजित ‘बांधकाम उद्योग’ या विषयावरील चर्चासत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…https://t.co/jZ3WDkXawF
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 15, 2022
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, ‘‘गृहनिर्माण विकास क्षेत्रातील नियमांमध्ये सुधारणा करून काही प्रमाणात अटी आणि नियम शिथिल करण्यात आले आहेत. लोकांना घर परवडणार्या मूल्यामध्ये मिळाले पाहिजे, याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. छोट्या आणि मोठ्या घरांच्या प्रकल्पांना शासन सवलती देण्यासाठी प्रयत्न करत आहे. शासनाकडून लोकहिताच्या प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. शेतकरी हितासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे लाखो हेक्टर भूमी सिंचनाखाली येईल. याचा शेतकर्यांना निश्चितच लाभ होईल. मुंबईत ३५० किलोमीटर मेट्रोची कामे चालू आहेत. या कामानंतर टप्प्याटप्प्याने वाहतुकीचा ताण न्यून होईल. धारावी प्रकल्प जगातील सगळ्यांत मोठा प्रकल्प होणार आहे. त्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान निश्चितच उंचावेल. प्रत्येक विभागामध्ये एक ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ चालू करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिक रहातो, त्या ठिकाणी सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्धार आहे.’’