कराड येथे ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा व्हावा, या मागणीसाठी ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ आंदोलन !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनास निवेदन !
कराड, १५ डिसेंबर (वार्ता.) – श्रद्धा वालकरची अमानुष हत्या करणार्या आफताबला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, शासनाने लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा संमत करावा, या प्रमुख मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील शिवतीर्थावर हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले, तसेच वरील मागणीचे निवेदन १२ डिसेंबर या दिवशी कराड येथील निवासी नायब तहसीलदार आनंद देवकर यांना देण्यात आले.
हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, बलात्कार, तसेच हत्या करणे आदी असंख्य गंभीर प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत. राज्यातून महिला आणि मुली बेपत्ता होण्यामागील षड्यंत्र, युवतींची तस्करी आणि त्यांचा आतंकवादी कारवायांसाठी होणारा वापर यांची चौकशी करण्यासाठी गृहखात्याने स्वतंत्र पथक नेमून दोषींवर कठोर कारवाई करावी. या प्रमुख मागण्या करण्यात येऊन मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी आंदोलनकर्त्यांकडून लव्ह जिहाद विरोधात घोषणा देण्यात आल्या.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीस पुष्पहार अर्पण करून आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कराड-पाटण तालुक्याचे कार्यवाहक श्री. सागर आमले, श्री. प्रदीप साळवे, श्री. गणेश देसाई, गोरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष श्री. सुनील पावसकर, धर्मजागरण समन्वयक श्री. गणेश महामुनी, शिवतेज संघटनेचे अध्यक्ष श्री. गणेश कापसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. राजेंद्र ढेरे, शिवसैनिक श्री. प्रवीण पाटील, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री हेमंत सोनवणे, मदन सावंत, मनोहर जाधव, अनिल कडणे, चेतन देसाई यांसह हिंदुत्वनिष्ठ आणि महिला उपस्थित होत्या.