पालापाचोळा जाळून निसर्गाची हानी न करता त्याचा झाडांच्या संवर्धनासाठी उपयोग करा !
१. पालापाचोळ्याचे महत्त्व
हिवाळ्यात बहुतेक सर्वच वृक्षांची पानगळ होते. साहजिकपणे या काळात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पालापाचोळा पडलेला दिसून येतो. प्रतिवर्षी होणारी ही नैसर्गिक क्रिया म्हणजे खरेतर निसर्गाने भूमीवर केलेले आच्छादन आहे. ज्याप्रमाणे आपण घरात वर्षभराचे गहू, तांदूळ इत्यादी धान्य साठवून ठेवतो, त्याप्रमाणे हे पालापाचोळ्याचे आच्छादन हा झाडांचा वर्षभराचा अन्नद्रव्यांचा साठा आहे; कारण हाच पालापाचोळा जिवाणूंच्या माध्यमातून कुजून झाडाला अन्न उपलब्ध होत असते. या पालापाचोळ्याने भूमीचे अती थंडी, ऊन, पाऊस यांपासून संरक्षण होऊन तिची सुपिकता टिकवून ठेवण्याचे कार्यही होत असते.
२. पालापाचोळा जाळणे चुकीचे
सर्वत्रच असे दिसून येते की, घराच्या आजूबाजूचा परिसर झाडून स्वच्छ केल्यानंतर साठलेला पालापाचोळ्याचा ढीग जाळून टाकला जातो. ज्यांच्या घराजवळच्या परिसरात मोठे वृक्ष आहेत, त्यांच्यासाठी तर ही पडणारी पाने झाडून जाळणे, म्हणजे एक नित्याचे कामच असते. मात्र ‘पालापाचोळा जाळून आपण हवेच्या प्रदूषणात भरच घालत असतो आणि पर्यावरणाची हानी करत असतो’, हे लक्षात घ्यायला हवे.
३. पालापाचोळ्याचा सदुपयोग
पालापाचोळा कुजून बनणारी भुसभुशीत सुपीक माती (ह्यूमस) झाडांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असते. झाडांना अन्नद्रव्ये पुरवणारा तो सर्वाेत्तम स्रोत आहे. पालापाचोळ्याचा लागवडीमध्ये पुढीलप्रमाणे सदुपयोग करता येतो.
३ अ. मातीला पर्याय म्हणून पालापाचोळ्याचा वापर : रोपांची लागवड करायला माती उपलब्ध नसेल, तर केवळ पालापाचोळा घालून कुंड्या किंवा विटांचे वाफे (लागवडीसाठी बनवलेले कप्पे) यांत लागवड करता येते. (याविषयीचा माहितीपट सनातनच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याची लिंक लेखाच्या शेवटी दिली आहे.) माती उपलब्ध असेल, तरीही कुंडी किंवा वाफे भरतांना मातीचा अल्प प्रमाणात उपयोग करून अधिकाधिक पालापाचोळाच वापरावा. असे केल्याने कुंड्या वजनाने हलक्या होतात आणि सहज हालवता येतात. छतावर लागवड करणार असू, तर पालापाचोळ्यामुळे छतावर अतिरिक्त भारही होत नाही.
३ आ. मोठ्या वृक्षांसाठी पालापाचोळ्याचा उपयोग करण्याची पद्धत : मोठ्या वृक्षांच्या भोवताली आळे (संरक्षक कठडा) करून त्यात पालापाचोळा भरून ठेवावा आणि नियमितपणे जीवामृत (देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांच्यापासून बनवलेले नैसर्गिक खत) शिंपडावे. यामुळे मोठ्या वृक्षाला आच्छादनाचे (भूमी पालापाचोळ्याने झाकण्याचे) सर्व लाभ मिळतात अन् त्याचा सकारात्मक परिणाम झाडाच्या होणार्या चांगल्या वाढीतून लक्षात येतो.
४. पालापाचोळ्याचे विघटन झाल्याने माती भुसभुशीत होणे
पालापाचोळ्याचे विघटन होऊन तो मातीत मिसळण्याची क्रिया सतत होत राहिल्याने माती भुसभुशीत होते. भुसभुशीत मातीमध्ये रोपांच्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते, तसेच पाण्याचा योग्य रितीने निचरा होऊन ‘वाफसा स्थिती’ (मातीत झाडासाठी आवश्यक ओलावा) टिकून रहाण्यास साहाय्य होते.
५. पालापाचोळा साठवून ठेवणे आवश्यक
‘सुभाष पाळेकर कृषी’ या तंत्राच्या साहाय्याने लागवड करतांना आच्छादनाचे (भूमी पालापाचोळ्याने झाकण्याचे) महत्त्व आपण यापूर्वीच्या लेखांतून समजून घेतलेलेच आहे. या आच्छादनावर नियमितपणे जीवामृत शिंपडत राहिल्याने त्याच्या विघटनाची क्रिया जलद गतीने होते आणि रोपांना सतत अन्नद्रव्ये उपलब्ध होत रहातात. अगोदर घातलेले आच्छादन विघटित होऊ लागले की, पुन्हा पालापाचोळा घालणे नियमितपणे करावे लागते. त्यामुळे या पानगळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर मिळणारा पालापाचोळा साठवून ठेवावा.
६. अतिरिक्त प्रमाणात असलेला पालापाचोळा इतरांना द्या !
घराजवळ अनेक मोठी झाडे असल्याने जर अतिरिक्त प्रमाणात पालापाचोळा मिळत असेल, तर लागवडीची आवड असलेल्या आपल्या परिसरात रहाणार्या अन्य लोकांना तो अवश्य द्यावा. पालापाचोळा जाळून निसर्गाची हानी करण्यापेक्षा अन्य लागवडप्रेमींना केलेले साहाय्य पुष्कळ मोलाचे आहे.
वरील सर्व सूत्रांवरून ‘पालापाचोळा हा कचरा नाही’, हे आपल्या लक्षात आले असेल. आपण पालटलेली एक लहानशी कृती पर्यावरण रक्षणाला हातभार लावणारी ठरते, हे लक्षात घेऊन पालापाचोळा न जाळता त्याचा सदुपयोग करण्याचा निश्चय करूया !’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१०.१२.२०२२)
पालापाचोळा घालून कुंड्या किंवा विटांचे वाफे कसे बनवावेत, हे समजून घेण्यासाठी भेट द्या ! – सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम