आगामी ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घाला !

अयोध्येतील महंत राजू दास यांची मागणी

अयोध्येतील महंत राजू दास (डावीकडे) अभिनेते शाहरुख खान (उजवीकडे )

अयोध्या – येथील महंत राजू दास यांनी अभिनेते शाहरुख खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या आगामी ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली. ‘पठाण’ चित्रपट ज्या ज्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाईल, ते चित्रपटगृह जाळून टाकण्यात येईल’, अशी चेतावणीही त्यांनी दिली.

महंत राजू दास पुढे म्हणाले की, हिंदी चित्रपटसृष्टी, तसेच ‘हॉलीवूड’ यांमध्ये सातत्याने ‘सनातन धर्माची कशी खिल्ली उडवता येईल ?’, हाच प्रयत्न केला जातो. ‘हिंदु देवतांचा कसा अपमान करता येईल ?’, हीच संधी शोधली जाते. ‘पठाण’ चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादुकोण यांनी ‘बेशरम रंग’ या गाण्यात भगव्या रंगाचे अंतवर्स्त्र परिधान करून भगव्या रंगाचा अवमान केला आहे. हिंदूंच्या धार्मिक भावनांना ठेच पोचवण्यासाठी हे मुद्दाम केले गेले आहे. लोकांनीच यावर कठोर कारवाई केली पाहिजे. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की, त्यांनी पठाण चित्रपटावर बहिष्कार घालावा.’’

हिंदु महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनीही या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.

इंदूरमधील चौकात जाळले अभिनेत्री दीपिका आणि अभिनेते शाहरुख यांचे पुतळे

चित्रपटात पालट केले नाहीत, तर राज्यात तो प्रदर्शित करायचे कि नाही ?, याचा विचार करू ! – मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांची चेतावणी

इंदूर (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावर आक्षेप घेतल्यानंतर येथे आंदोलन करण्यात आले. ‘वीर शिवाजी’ नावाच्या गटाने केलेल्या आंदोलनामध्ये अभिनेत्री दीपिका आणि अभिनेता शाहरुख खान यांचे पुतळे जाळण्यात आले. ‘या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी’, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली. हा चित्रपट जानेवारी मासात प्रदर्शित होणार आहे.

नरोत्तम मिश्रा म्हणाले की, ‘पठाण’ चित्रपट दोषपूर्ण असून विषारी मानसिकतेवर आधारित आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्याचे बोल आणि कलाकारांनी घातलेले भगवे आणि हिरवे कपडे, यांमध्ये निर्मात्यांनी पालट करणे आवश्यक आहे. काही दृश्यांमध्ये पालट केला पाहिजे, नाही तर मध्यप्रदेशात हा चित्रपट चित्रपट प्रदर्शित होऊ द्यायचा कि नाही ?, याविषयी आम्ही निर्णय घेऊ.