गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर स्थिर राहून कठीण प्रसंगांना सामोरे जाणार्या खानापूर (जिल्हा बेळगाव) येथील सौ. पूजा परशुराम पाटील !
गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर स्थिर राहून कठीण प्रसंगांना सामोरे जाणार्या खानापूर (जिल्हा बेळगाव) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पूजा परशुराम पाटील !
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम पाटील यांना त्यांची पत्नी ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पूजा पाटील यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. १५.१२.२०२२ या दिवशीच्या अंकांत काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/636139.html
६ इ. महाविद्यालयातून येतांना मुलाचा मोठा अपघात होणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेच्या बळावर परिस्थिती शांतपणे हाताळणे : माझा मोठा मुलगा सूरज महाविद्यालयातून दुचाकीवरून घरी येतांना मोठा अपघात झाला होता. त्या वेळी समोरच्या व्यक्तीला पुष्कळ मोठी दुखापत झाली होती. तेव्हा सूरजला पुष्कळ मोठी इजा न होता तो केवळ बेशुद्ध झाला होता. त्या वेळीही तिने मला काहीच न कळवता शांतपणे ती परिस्थिती हाताळली. मला माझ्या मित्रांनी वरील प्रसंग दूरभाष करून सांगितला. चिकित्सालयात गेल्यावर सूरज दोन-तीन घंट्यांनी शुद्धीवर आला. थोड्या वेळाने मी दूरभाष करून तिला सांगितले, ‘‘मी तिकडे यायला निघालो आहे.’’ त्या वेळी ती म्हणाली, ‘‘तुम्ही लगेच यायची आवश्यकता नाही. तुम्ही तुमची सेवा आवरून दुसर्या दिवशी आलात, तरी चालेल.’’ वरील प्रसंग घडल्यानंतर मी विचारले, ‘‘या प्रसंगात तुला काही वाटले नाही का ?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर असतांना आपल्याला काय भीती वाटणार ? ते सर्व करणार आहेत.’’
६ ई. प्रकृती बिघडल्यामुळे रामनाथी आश्रमात येऊनही आश्रम पहाता न येणे आणि ‘मला आश्रमात यायला मिळाले, हेच माझ्यासाठी पुष्कळ मोठे आहे’, असे सांगणे : बेळगाव येथील सत्संगातील सर्व साधकांना रामनाथी आश्रमाला भेट देण्याची संधी मिळाली. त्या वेळी तिलाही इकडे येण्याची संधी मिळाली; पण आश्रमात येतांना तिला प्रवासात उलटीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे आश्रमात आल्यावर तिला झोपावे लागले. समवेतचे सर्वजण आश्रम पाहून परतीच्या प्रवासाला निघाले. मी तिला दुसर्या दिवशी म्हणालो, ‘‘तुला आश्रमात येऊन आश्रम पाहता आला नाही.’’ त्या वेळी ती म्हणाली, ‘‘मला आश्रमात यायला मिळाले’, हेच माझ्यासाठी पुष्कळ मोठे आहे.’’ प्रत्यक्षात तिला ठाऊक होते, ‘आपल्याला प्रवासात पुष्कळ त्रास होणार’; पण ‘आश्रमात यायला मिळावे’, यासाठी ती आश्रमात आली होती.
६ उ. काही वेळा मुले बाहेरगावी गेल्यानंतर तिला घरी एकटीला रहायला आणि झोपायला लागायचे. त्या वेळी मी तिला विचारले, ‘‘तुला भीती वाटत नाही का ?’’ त्यावर ती म्हणायची, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या आश्रमात कसली भीती ? ते समवेत आहेत ना ?’’
६ ऊ. वैयक्तिक जीवनात पुष्कळ लहान-मोठ्या अडचणी येऊनही मनाने न खचता त्यांना धिराने सामोरे जाणे : तिच्या वैयक्तिक जीवनात पुष्कळ लहान-मोठ्या अडचणी आल्या आहेत. त्या वेळी ती परात्पर गुरु डॉक्टरांचा धावा करून त्यांना सांगायची आणि अशा प्रसंगात मनाने न खचता त्याला सामोरे जायची. त्या वेळी मी तिच्या जागी असतो, तर पुष्कळ खचलो असतो.
७. कोणतीही परिस्थिती सहजतेने स्वीकारणे
७ अ. आर्थिक अडचणींमुळे घराचे बांधकाम पूर्ण होण्यास अडचण येणे, त्या वेळी घरमालकांनी भाड्याचे घर सोडून देण्यास सांगणे आणि अर्धवट काम झालेल्या घरात पत्नीने कोणतेही गार्हाणे न करता रहाणे : लग्नानंतर आम्ही ठरवले, ‘आपली जागा आहे, तर घर बांधूया.’ घराचे बांधकाम पूर्ण झाले होते; पण आर्थिक अडचणीमुळे त्याचे ‘फिनिशिंग’ राहिले होते. त्या वेळी आम्ही ज्या घरात भाड्याने रहात होतो, त्याच्या मालकांनी सांगितले, ‘‘तुम्ही लवकरात लवकर घर रिकामे करून द्या.’’ ती भाड्याचे घर सोडून अर्धवट स्थितीत असलेल्या घरात शांतपणे राहू लागली; पण तिने कधीच गार्हाणे केले नाही. मी तिला म्हणालो, ‘‘घर अर्धवट ठेवण्यापेक्षा आपण कर्ज काढून किरकोळ गोष्टी पूर्ण करूया.’’ त्या वेळी ती म्हणाली, ‘‘कर्ज काढायला नको. आपल्याला कर्ज फेडायला अडचण येईल. आपल्याला जेव्हा जमेल, तेव्हा पूर्ण करूया. आता मुलांचे शिक्षणही चालू आहे.’’
७ आ. वैयक्तिक खरेदी करायची असेल अथवा घरी एखादी वस्तू घ्यायची असेल, तर मला विचारल्यावर मी तिला म्हणायचो, ‘‘आपण नंतर घेऊया.’’ त्यावर ती लगेच ‘हो’ म्हणायची. ‘ही वस्तू मला आताच हवी आहे’, असा हट्ट तिने कधीच केला नाही.
८. सेवेची तळमळ
८ अ. घरी सत्संग चालू झाल्यावर पुष्कळ आनंद होणे आणि साधकांसाठी प्रसाद अन् महाप्रसाद बनवण्याची सेवा आनंदाने करणे : काही दिवसांनी आमच्या वाड्यामध्ये सत्संग चालू झाला. त्या वेळी तिला पुष्कळ आनंद झाला. तिने लगेच मला दूरभाष करून सांगितले, ‘‘आता मला सेवेची संधी मिळाली.’’ साधकांचे आदरातिथ्य, तसेच साधकांसाठी प्रसाद आणि महाप्रसाद बनवण्याची सेवा ती प्रेमाने अन् आनंदाने करू लागली.
८ आ. कंबर दुखत असतांनाही शक्तीरथातील साधकांसाठी चुलीवर स्वयंपाक बनवणे : बेळगाव येथील खानापूर तालुक्यातील जांबोटी येथे सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात येणार होते. त्या वेळी मी तिला दूरभाष करून ‘७ – ८ जणांचा जेवणाचा डबा बनवायचा आहे’, असे सांगितले. दुसर्या दिवशी डबा बनवण्यापूर्वी तिची कंबर पुष्कळ दुखत होती. त्या वेळी तिला उठता-बसता येत नव्हते. ‘आता साधकांचा डबा तर बनवायचा आहे. आपण इतरांना सांगितले, तर आपली सेवेची संधी जाणार आणि ऐन वेळी इतर साधकांना सांगितले, तर अडचण येणार’, असा विचार करून आहे त्या परिस्थितीत सेवा स्वीकारून तिने ७ – ८ जणांचे जेवण चुलीवर बनवले.
९. पतीला घरात अडकू न देता सेवेला प्राधान्य देण्यास सांगणे
९ अ. पतीला सणांच्या वेळी घरी न येता आश्रमात सेवा करण्यास सांगणे : ‘श्री गणेशचतुर्थी आणि दिवाळी या वेळी मी घरी येऊ का ?’, असे विचारल्यावर ती म्हणायची, ‘‘आश्रमातील बरेच साधक घरी गेले असतील. त्यामुळे तुम्ही तेथेच थांबा. तुमची आवश्यकता तेथे आहे. सर्व साधक घरून आश्रमात परत आल्यावर तुम्ही घरी येऊ शकता.’’
९ आ. महापुरामुळे घरी अडकल्याने पतीला आश्रमात सेवेला जाता न आल्याने खंत वाटणे, पतीला आश्रमात जाण्यासाठी ‘कोणता मार्ग चालू आहे ?’, याविषयी लोकांकडे चौकशी करणे आणि पतीच्या मित्रांच्या साहाय्याने त्यांना दुचाकीवरून आश्रमात पोचवण्याची व्यवस्था करणे : वर्ष २०१९ मध्ये जेव्हा कर्नाटकमध्ये महापूर आला होता, तेव्हा मी काही कामानिमित्त घरी गेलो होतो. त्या वेळी महापुरामुळे मी घरी अडकलो. सर्व वाहतूक बंद होती. तेव्हा पत्नी दिवसातून ४ – ५ वेळा ‘कोणता मार्ग चालू आहे ? पती गोव्याला सेवा करण्यासाठी कसे जाऊ शकतात ?’, याविषयी लोकांकडे सतत चौकशी करायची. त्या वेळी तिला वाटायचे, ‘मी घरी राहिलो, तर माझा साधनेतला वेळ जातो.’ त्याची तिला पुष्कळ खंत होती. त्या वेळी माझ्यापेक्षाही तिलाच खंत असल्याचे मला जाणवत होते. तिने वाड्यातील माझ्या मित्रांना विचारले, ‘‘तुम्ही ह्यांना दुचाकीवरून आश्रमात सोडू शकता का ?’’ त्या वेळी मित्रांनी लगेच होकार देऊन मला आश्रमात आणून सोडले. यावरून तिची ‘मी आश्रमात जाऊन सेवा करावी’, याची तीव्र तळमळ माझ्या लक्षात आली.
९ इ. वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेच्या आधी मला थोडा वेळ होता. त्या वेळी मी तिला विचारले, ‘‘मी घरी येऊ का ?’’ त्यावर तिने स्पष्ट सांगितले, ‘‘माझा गुरुपौर्णिमेचा प्रसार चालू आहे. तुम्ही येऊ नका. तुम्ही तिकडेच सेवा करा.’’
१०. नातेवाइकांपेक्षा तिला साधक जवळचे वाटतात. साधक घरी गेले, तर ती त्यांना कधीच रिकाम्या हाताने पाठवत नाही.
११. मुलांना अर्पणाचे महत्त्व सांगणे : घरात तिने एक अर्पणपेटी ठेवली आहे. ती मुलांना सतत सांगते, ‘‘खाऊला कुणी पैसे दिले, तर त्यांतील राहिलेले पैसे; कपडे अथवा काही वस्तू खरेदी केल्यावर उरलेले पैसे, तसेच शिष्यवृत्ती मिळाल्यावर त्या रकमेतून आवश्यक वस्तू खरेदी करून उरलेले पैसे अर्पण करा.’’
१२. भाव
१२ अ. ‘घर हा आश्रम आहे’, असा भाव असणे आणि घरातील सर्व कामे सेवा म्हणून करणे : एकदा ती म्हणाली, ‘‘तुम्ही आश्रमात सेवा करता. मी घरातील कामे सेवा म्हणून करते. परात्पर गुरु डॉक्टरांनी मला सेवा म्हणून घर सांभाळण्यासाठी दिले आहे. हे घर माझ्यासाठी आश्रम आहे.’’ घरातील सर्व कामे ती सेवा म्हणून करते.
१२ आ. संतांप्रतीचा भाव
१२ आ १. नवरात्रीमध्ये ‘एक मुलगी म्हणजे सद्गुरु बिंदाताई (आताच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ) आणि दुसरी मुलगी म्हणजे सद्गुरु गाडगीळकाकू (आताच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) आहेत’, असा भाव ठेवून दोन मुलींचे कुमारिकापूजन करणे : वर्ष २०१९ च्या नवरात्रीमध्ये एका सेवेनिमित्त मी सद्गुरु (सौ.) बिंदाताईकडे गेलो होतो. त्या वेळी सद्गुरु ताई म्हणाल्या, ‘‘घरचे कसे आहेत ?’’ मी म्हणालो, ‘‘बरे आहेत.’’ त्यावर सद्गुरु ताई म्हणाल्या, ‘‘आज मला तुमच्या पत्नीची सकाळपासून पुष्कळ आठवण येत आहे. तुम्हाला आणि सूरजला (मुलाला) पाहिल्यावर मला त्यांची आठवण येत आहे. त्यांच्यामध्ये पुष्कळ गुण असून त्या कौतुक करण्यासारख्या आहेत.’’ त्यानंतर मी दूरभाष करून तिला सांगितले, ‘‘सद्गुरु बिंदाताई तुझी आठवण काढत होत्या. त्या तुझे कौतुक करत होत्या. त्या वेळी ती म्हणाली, ‘‘आज मी दोन मुलींचे कुमारिकापूजन केले. त्यांमध्ये ‘एक मुलगी म्हणजे सद्गुरु बिंदाताई आणि दुसरी मुलगी म्हणजे सद्गुरु गाडगीळकाकू आहेत’, असा भाव ठेवून मी पूजा केली.’’ त्या वेळी तिने भाव ठेवून केलेली पूजा इकडे सद्गुरु ताईंना पोचल्याचे माझ्या लक्षात आले.
१२ आ २. प्रसारातील तिच्या उत्तरदायी साधिकेमध्ये ती सद्गुरु बिंदाताईंचे रूप पहाते.
१२ आ ३. यज्ञाच्या वेळी एका संतांना भेटायला न जाता जागेवरच बसून रहाणे आणि त्या वेळी ‘मी त्या संतांचा आशीर्वाद घेत होते’, असे सांगणे : वर्ष २०१९ मध्ये एकदा रामनाथी आश्रमात एका यज्ञाच्या वेळी तिला यज्ञाला बसण्याची संधी मिळाली होती. तेव्हा त्या यज्ञाला एक संत आले होते. त्या वेळी बरेच साधक यज्ञ झाल्यावर त्यांना पहाण्यासाठी बाहेर गेले. तेव्हा ती जागेवरच बसून होती. मी तिला विचारले, ‘‘तू त्यांना पहाण्यासाठी बाहेर गेली नाहीस का ?’’ त्यावर ती म्हणाली, ‘‘मी इथे बसून त्या संतांचा आशीर्वाद घेत होते.’’
१२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीचा भाव
१२ इ १. कृतज्ञताभाव : ती म्हणते, ‘‘तुम्ही आश्रमात साधना करता. त्यामुळे आपल्या घरात कुणाला शारीरिक व्याधी नाहीत अथवा काही अडचण नाही. देवाने आपल्याला किती चांगले आणि आनंदात ठेवले आहे ! परात्पर गुरु डॉक्टरांची आपल्यावर अपार कृपा आहे. त्यामुळे आपले कुटुंब आनंदात जगत आहे.’’
१२ इ २. गाव शहरापासून लांब असतांनाही घरात लागणार्या सर्व वस्तू स्वतः आणणे आणि त्यासाठी एकटे जातांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, असा भाव ठेवल्याने कुणाकडूनही साहाय्य मिळून काम पूर्ण होणे : आमचे गाव शहरापासून ८ कि.मी. लांब आहे, तरी ती घरात लागणार्या सर्व वस्तू, उदा. सिलींडर, भाजीपाला, रेशन इत्यादी स्वतः आणते. त्यासाठी ती माझ्यावर कधीच अवलंबून राहत नाही. ती एकटीच अधिकोषात जाते. मी तिला ‘तू एकटीच गेलीस का ?’, असे विचारल्यावर ती म्हणायची, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर आहेत.’’ तिने भाव ठेवल्यामुळे तिला कुणाकडून तरी साहाय्य मिळायचे आणि तिचे काम पूर्ण व्हायचे. असे तिला पुष्कळ अनुभव आले आहेत.
१२ इ ३. ‘आश्रमातील प्रसाद परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाठवलेला असल्याने तो सगळ्यांना मिळायला हवा’, या भावाने तो सर्वांना देणे : मी आश्रमातील प्रसाद घेऊन घरी जातो. त्या वेळी ती स्वतः थोडाच खाऊन बाकीच्यांना आणि वाड्यातील साधकांना देण्यासाठी पुष्कळ धडपडते. त्या वेळी तिचा भाव असतो, ‘तो परात्पर गुरु डॉक्टरांनी पाठवला आहे. तो सर्वांना मिळू दे. त्यातील चैतन्य सर्वांना मिळू दे.’
१२ इ ४. पतीची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर ‘आता मलापण आशीर्वाद द्या’, असे सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगणे आणि त्या वेळी ते आशीर्वाद देऊन गेल्याचे जाणवणे : माझी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर आश्रमातील एका साधिकेने तिला दूरभाष करून कळवले. त्या वेळी तिने लगेच घरात गोड पदार्थ करून देवघरात कुलदेवाला आणि परात्पर गुरु डॉक्टरांना नैवेद्य दाखवला अन् ‘आता मलापण आशीर्वाद द्या’, असे सांगितले. त्या वेळी साक्षात् परात्पर गुरु डॉक्टर येऊन आशीर्वाद देऊन गेल्याचे तिने सांगितले.
१२ इ ५. मुले जेव्हा आश्रमात सेवेला यायची, तेव्हा ती त्यांना सांगायची, ‘‘तुम्हाला परात्पर गुरु डॉक्टर भेटतील, तुमच्याशी बोलतील’, अशी अपेक्षा ठेवू नका. तुम्ही भावपूर्ण सेवा करा. देवाला सर्व कळते.’’
‘परात्पर गुरुमाऊली, तुमच्या कृपेने मला साधनेत साहाय्य करणारी पत्नी मिळाल्यामुळे मी आश्रमात राहून साधना करू शकतो. त्यासाठी मी तुमच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’ (समाप्त)
– श्री. परशुराम पाटील (पती), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१०.२०१९)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |