सकारात्मक आणि सेवेची तळमळ असणारे चि. अमर जोशी अन् कौशल्यपूर्ण सेवा करणार्या चि.सौ.कां. मानसी कुलकर्णी !
१. चि. अमर जोशी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१ अ. श्री. संजय दत्तात्रेय जोशी (श्री. अमर जोशी यांचे वडील, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), जुन्नर, जिल्हा पुणे.
१. ‘अमरच्या जन्मानंतर आमच्या घरातील परिस्थिती सुधारून अडचणी न्यून झाल्या.
२. त्याचे प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून चालू होते. आम्ही साधनेत आल्यावर ‘मातृभाषेतून शिक्षण घ्यायला हवे’, हे समजल्यावर त्याने मराठी शाळेत प्रवेश घेतला.
३. अमर लहानपणापासूनच प्रगल्भ आहे. तो ५ वर्षांचा असतांना आम्ही त्याला पुण्यातील श्री. घैसासगुरुजी यांच्या पाठशाळेत नेले होते. त्या वेळी ‘त्याची मुंज झाली की, त्याला आणू शकता’, असे गुरुजींनी सांगितले होते. गुरुकृपेने त्यानंतर १२ वर्षांनी त्याने सनातन पुरोहित पाठशाळेत तेच शिक्षण पूर्ण केले.
४. घरापासून लांब राहूनही त्याचे घराकडे बारकाईने लक्ष असते. घरातील अडचणी विचारून तो त्यांवर सकारात्मकतेने उपाय काढतो.’
१ आ. श्री. ईशान जोशी, सनातन पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ आ १. सकारात्मकता : ‘एकदा एका यज्ञाच्या सेवेत झालेल्या चुकांमुळे माझी चिडचिड होत होती. त्या वेळी मी अमरला ‘मला हे स्वीकारता येत नाही’, असे सांगितले. त्यावर त्याने मला सांगितले, ‘‘आपण स्थिर राहून सगळे स्वीकारले पाहिजे. जे झाले, ते विसरून पुढील सेवा मनापासून आणि एकाग्रतेने करूया. त्यामुळे आपली सेवा देवाला अपेक्षित अशी होईल.’’
१ इ. सनातन पुरोहित पाठशाळेतील साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ इ १. सेवेची तळमळ
अ. ‘अमरदादा सुटीसाठी जेव्हा घरी जातो, त्या वेळीही ‘पाठशाळेत काही अडचण असल्यास घरी राहूनही पाठशाळेतील साधकांना कसे साहाय्य करता येईल ?’, असा त्याचा विचार असतो.
आ. विवाहाच्या सिद्धतेसाठी तो घरी गेला होता. तेव्हा त्याची सिद्धता अपेक्षेपेक्षा १० दिवस लवकर झाली. त्यामुळे तो पुन्हा आश्रमात सेवेसाठी आला.
इ. यज्ञ असो अथवा कोणतीही सेवा; तो वेळेच्या ५ मिनिटे आधीच तेथे उपस्थित रहातो. रात्री कितीही उशीर झाला, तरी तो नियोजित सेवेला वेळेत उपस्थित असतो.
ई. त्याला नवनवीन सेवा शिकायला आवडतात. त्यामुळे त्याला संगणकीय आणि शारीरिक, अशा सगळ्या सेवा करता येतात.’
२. चि.सौ.कां. मानसी कुलकर्णी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
२ अ. सौ. वंदना संजय जोशी (चि.सौ.कां. मानसी यांच्या भावी सासूबाई (चि. अमर जोशी यांची आई)), जुन्नर, जिल्हा पुणे.
१. ‘मानसी नम्रपणे आणि एका लयीत बोलते.
२. तिच्याशी बोलतांना परकेपणा न वाटता कोणत्याही विषयाच्या संदर्भात मोकळेपणाने बोलता येते.
३. तिला एखादी गोष्ट येत नसेल, तर ती तसे प्रांजळपणे लगेच सांगते.
४. ती निरागस आहे. त्यामुळे आमच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले आहे.’
२ आ. श्री. संजय दत्तात्रेय जोशी (चि.सौ.कां. मानसी यांचे भावी सासरे (चि. अमर जोशी यांचे वडील)), आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), जुन्नर, जिल्हा पुणे.
१. ‘मानसी कोणतीही कृती विचारून करते. त्या वेळी तिच्यातील साधकत्व प्रकर्षाने जाणवते.
२. ती मला ‘माझी आध्यत्मिक प्रगती होण्यासाठी मी कोणते प्रयत्न करू ?’, असे विचारते.’
२ इ. ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात सेवा करणारे साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ इ १. बालपणापासूनच साधनेची गोडी निर्माण होणे : ‘चि.सौ.कां. मानसी हिचे आई-वडील सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असल्यामुळे त्यांनी मानसीवरही बालपणापासूनच साधनेचे संस्कार केले आहेत. त्यामुळे तिच्या मनात साधनेची गोडी निर्माण झाली आणि तिने सनातनच्या आश्रमात राहून साधना करण्याचा निर्णय घेतला.
२ इ २. प्रेमभाव : ‘सनातन प्रभात’च्या पानांची संरचना करणारा साधक किंवा साधिका नवीन असेल, तर मानसी त्यांना प्रेमाने शिकवते आणि त्यांच्याकडून झालेल्या चुकाही त्यांना प्रेमाने सांगते. तिच्या मनात त्यांच्याकडून अपेक्षा नसतात. ती त्यांच्या अडचणीही समजून घेते, तसेच ‘अधिकाधिक चांगले कसे करू शकतो ?’, याविषयी त्यांना सांगते.
२ इ ३. सेवेची तळमळ
२ इ ३ अ. शिकण्याची वृत्ती असणे आणि कौशल्यपूर्ण सेवा करणे : मानसीने ‘सनातन प्रभात’च्या संरचनेची सेवा लवकर शिकून घेतली. ही सेवा ती कौशल्यपूर्ण करण्याचा प्रयत्न करते. प्रतिदिनचे दैनिक असो वा दैनिकाचे विविध विशेषांक असोत, ती सेवा अधिकाधिक चांगली करण्याचा प्रयत्न करते. दैनिकामध्ये विशेषांकाच्या वेळी छायाचित्रांवर वैशिष्ट्यपूर्ण काम करावे लागते. तिच्याकडे ते कौशल्य असल्याने ती संयम ठेवून सेवा अधिकाधिक चांगली करण्याचा प्रयत्न करते. तिच्या सेवेची गतीही चांगली आहे.
२ इ ३. विविध कलागुण अवगत असणे : तिच्यामध्ये ‘सनातन प्रभात’च्या पानांच्या संरचनेसह ‘चित्रे काढणे, मेंदी काढणे’ इत्यादी कौशल्येही आहेत. तिने काढलेली देवता आणि प.पू. गुरुदेव यांची वेगवेगळे भाव दर्शवणारी चित्रे ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेली आहेत. गुरुदेवांनी वेळोवेळी या चित्रांचे कौतुक करून तिला प्रसाद दिला आहे. आश्रमात विवाह सोहळ्यांच्या वेळी वधूच्या आणि अन्य साधिकांच्या हातावर ती आकर्षक अन् सात्त्विक पद्धतीने मेंदी काढते.
२ इ ४. स्वतःला पालटण्याची तळमळ : सेवा करतांना किंवा वैयक्तिक कारणास्तव एखादा प्रसंग निर्माण झाल्यास पूर्वी तिच्या मनाचा पुष्कळ संघर्ष होत असे. त्यावर मात करणे तिला सहज शक्य होत नसे. त्यानंतर तिला आपल्या स्थितीची जाणीव होऊ लागल्यावर तिने श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, संत आणि उत्तरदायी साधक यांचे मार्गदर्शन घेऊन त्यावर मात करण्याचा चिकाटीने प्रयत्न केला. त्यामुळे तिच्या मनाचा संघर्ष होण्याचे प्रमाण आता बर्याच प्रमाणात न्यून होऊन तिच्या आनंदात वाढ झाली आहे. एखादा प्रसंग घडल्यास सकारात्मक विचार करून ती प्रसंगातून वेळीच बाहेर पडते आणि परिस्थिती स्वीकारते. पूर्वी तिला चूक सांगितल्यास राग येत असे किंवा तिच्या मनात प्रतिक्रिया उमटत असे; मात्र आता चूक सांगितल्यास त्यावर चिंतन करून ती लगेच संबंधित साधकाची क्षमा मागते.
२ इ ५. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : व्यष्टी साधनेचे प्रयत्न पूर्ण होण्यासाठी तिची धडपड असते. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत लिखाण, स्वयंसूचनांची सत्रे, भावजागृतीचे प्रयत्न यांमध्ये तिचे सातत्य असते. जेव्हा ‘सनातन प्रभात’च्या तातडीच्या सेवा असतात, तेव्हाही ती मध्ये मध्ये थांबून स्वयंसूचनांचे सत्र करण्याचा प्रयत्न करते.
२ इ ६. संत आणि उत्तरदायी साधक यांच्यावर श्रद्धा असणे : गुरुसेवा करतांना किंवा व्यष्टी साधनेचे प्रयत्न करतांना तिला काही अडचणी आल्यास ती वेळोवेळी संत किंवा उत्तरदायी साधक यांचे मार्गदर्शन घेते. त्यांनी सांगितलेले प्रयत्न ती श्रद्धेने करण्याचा प्रयत्न करते.
२ इ ७. ‘गुरूंना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) अपेक्षित असे लवकरात लवकर घडायचे आहे’, असा तिचा भाव असतो.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ९.१२.२०२२)