सहजता, संयम आणि नेतृत्वगुण असलेले देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निनाद गाडगीळ !
देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निनाद गाडगीळ यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. व्यवस्थितपणा
‘श्री. निनाद यांच्याकडे सेवांचे नियोजन व्यवस्थितपणे लिहिलेले असते. ते सेवेचे साहित्य आणि कागदपत्रे व्यवस्थित ठेवतात. त्यांच्या संगणकीय संचिकांमध्ये सेवांनुसार वर्गवारी केलेली असते. त्यामुळे श्री. निनाद यांना ऐन वेळी कुठल्याही सेवेविषयी कुणी विचारल्यास त्यांना लगेचच उत्तर देणे सोयीचे जाते.
२. उत्तम निरीक्षणक्षमता
त्यांनी लिहून दिलेल्या ‘आश्रमस्तरावर लक्षात येणार्या अडचणी आणि साधकांकडून होत असलेल्या चुका’ यांतून त्यांची अचूक निरीक्षणक्षमता लक्षात येते. आश्रमात येता-जाता आश्रमातील साधकांना लक्षात न येणार्या अनेक सूत्रांची नोंद निनाद यांनी घेतलेली असते.
३. घरातील प्रत्येक कामात साहाय्य करणे
त्यांना घरातील कोणतेही काम करण्यात न्यूनता वाटत नाही. त्यांची इतरांकडून कोणतीही अपेक्षाही नसते. त्यांच्याकडून सर्व कृती शांतपणे केल्या जातात.
४. साधकांना आधार देणे
त्यांच्या बोलण्यात सहजता असते. सहसाधक त्यांना स्वतःच्या अडचणी मनमोकळेपणाने सांगतात. अनेक साधकांना श्री. निनाद यांचा आधार वाटतो. आश्रमातील कुठल्याही साधकाला काही अडचण आली, तर त्यांना प्रथम नाव आठवते, ते निनाद यांचे ! ‘निनाद यांना अडचण सांगितल्यास ते आपल्याला निश्चितच साहाय्य करतील’, अशी अनेक साधकांना निश्चिती असते.
५. संयमी
त्यांना कुणी कधीही सेवेसाठी संपर्क केल्यास ते शांतपणे आणि संयम ठेवून साधकांशी संवाद साधतात. साधकांनी श्री. निनाद यांना ते महाप्रसाद ग्रहण करतांना किंवा कधी रात्री-अपरात्री जरी संपर्क केला, तरी ते कधीच चिडत नाहीत. त्याही वेळी ते साहाय्याच्याच भूमिकेत असतात.
६. अनावश्यक वेळ वाया न घालवता सतत साधनारत रहाणे
‘आश्रम आणि सेवा हेच माझे सर्वस्व आहे’, असे ते नेहमी सांगतात. त्यांना बाहेर फिरायला जाणे आवडत नाही. ‘सर्वकाही आपल्या गुरूंच्या चरणांपाशी आहे’, असे त्यांना वाटते. त्यामुळे ‘त्यांनी कधी वेळ वाया घालवला किंवा त्यांचा वेळ अनावश्यक गेला’, असे त्यांच्याकडून होत नाही.
७. रुग्णाईत वडिलांची सेवा ‘संतसेवा’ या भावाने करणे
त्यांचे वडील (कै.) अरविंद गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) शारीरिक त्रासामुळे अंथरुणाला खिळून होते. त्यांची सेवा करतांना पूर्वी काही वेळा निनाद यांची चिडचिड व्हायची. याची त्यांना जाणीव करून दिल्यावर ते वडिलांची सेवा ‘संतसेवा’ या भावाने करू लागले. त्यामुळे ‘वडिलांचे वैयक्तिक आवरणे, त्यांना जेवण भरवणे’ आदी कृती करतांनाही त्यांच्यात सहजता आणि प्रेम जाणवायचे.
८. ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने सेवा करणे
‘साधकांची व्यष्टी साधना, आश्रमातील स्वच्छता किंवा एखादे नियोजन’, यांच्या संदर्भात लक्षात येणारी अनेक सूत्रे ते उत्तरदायी साधकांना कळवतात. यातून त्यांचा ‘दिसेल ते कर्तव्य’, हा भाव दिसून येतो.
९. नेतृत्वगुण
‘एखादी सेवा पुढाकार घेऊन करणे, संबंधित साधकांच्या अडचणी सोडवणे, सेवा पूर्ण होईपर्यंत चिकाटी आणि संयम राखणे, साधकांना प्रत्येक टप्प्यावर साहाय्य करणे, उत्तरदायी साधकांशी प्रत्येक वेळी समन्वय साधून संबंधित सेवांविषयी विचारून घेणे’, हे सर्व चालू असतांना स्वतःच्या वैयक्तिक गोष्टीही शांतपणे करणे’, हे निनाद यांना उत्तम प्रकारे जमते.
९ अ. दायित्व घेऊन सेवा करणे : निनाद यांच्याकडे विविध प्रकारच्या सेवा असतात. त्यांच्याकडे काही वेळा ‘आश्रमातील सेवांच्या संदर्भात समाजात जाऊन काही व्यक्तींना संपर्क करणे, वयस्कर साधकांना येणार्या अडचणी सोडवणे, तसेच आश्रमस्तरावर काही समस्या असल्यास त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, काही सेवांच्या अनुषंगाने सहसाधकांशी समन्वय साधणे’, या आणि अशा विविध स्वरूपाच्या सेवा आहेत. त्या सेवा करतांना संबंधित सूत्रांचा सखोल अभ्यास करून, तसेच त्यांतील सर्व बारकावे लक्षात घेऊन सेवा पूर्ण करायची असते. निनाद सर्व टप्प्यांनुसार दायित्व घेऊन सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
९ आ. दळणवळण बंदीच्या काळात शासनाने घालून दिलेल्या नियमांतील बारकावे शिकून घेतल्याने साधकांसाठी ती प्रक्रिया सोपी होणे : कोरोनामुळे लागू झालेल्या दळणवळण बंदीच्या काळात आश्रमातील काही साधकांना त्यांच्या घरगुती अडचणींमुळे घरी जाणे आवश्यक होते. शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार त्यांच्यासाठी ‘पास’ (परवाना, अनुमती पत्रक) काढणे अपरिहार्य होते. निनाद यांनी ‘पास’ काढण्याची प्रक्रिया, त्यातील अडचणी आणि बारकावे, या गोष्टी शिकून घेतल्या. त्यामुळे साधकांसाठी घरी जातांना ‘पास’ काढण्याची प्रक्रिया सोपी आणि सहजतेने पूर्ण झाली.
९ इ. सरकारी नियमांची माहिती असल्याने साधकांना साहाय्य करता येणे : एकदा सनातन संस्थेचे मोठे वाहन अन्य राज्यात पाठवायचे होते; मात्र दळणवळण बंदी असल्याने वाहतुकीच्या संदर्भातील नियमांचा अध्यादेश शासनाने काढला होता. निनाद यांना त्याविषयीची संपूर्ण माहिती असल्याने त्यांनी वाहनाच्या समवेत जाणार्या साधकांना अध्यादेशाची प्रत काढून दिली. त्यामुळे त्या साधकांना मार्गात कोणतीही अडचण आली नाही.
१०. संतांचे आज्ञापालन करणे
१० अ. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी सांगितल्याप्रमाणे प्रतिदिन मनाच्या स्तरावरील २ चुका प्रांजळपणे फलकावर लिहिणे : सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी श्री. निनाद यांना प्रतिदिन मनाच्या स्तरावरील २ चुका फलकावर लिहायला सांगितल्या होत्या. त्यानुसार त्यांनी प्रतिदिन फलकावर तशा स्वरूपाच्या चुका लिहिल्या. ते प्रांजळपणे चुका लिहायचे.
१० आ. पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी सांगितल्याप्रमाणे आश्रमस्तरावर लक्षात येणारी सूत्रे प्रतिदिन लिहून देणे : आश्रमस्तरावर पालट करण्याच्या दृष्टीने पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी श्री. निनाद यांना आश्रमाच्या संदर्भात लक्षात येणारी सूत्रे प्रतिदिन लिहून द्यायला सांगितली होती. प्रारंभी सूत्रे लिहून दिल्यावर ‘ती लगेचच पूर्ण व्हायला हवीत’, अशी श्री. निनाद यांची अपेक्षा असायची. काही दिवसांनी सूत्रे लिहून दिल्यावर त्यांच्या मनातील अपेक्षांचे प्रमाण न्यून झाले आणि ‘आश्रम माझा आहे’, हा भाव त्यांच्यात वाढल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांना सर्वांविषयीच आपुलकी वाटू लागली.
११. जाणवलेला पालट – चुका स्वीकारून सकारात्मक रहाणे
पूर्वी त्यांच्याकडून चुका झाल्यावर त्यांना ‘दायित्व घ्यायला नको’, असे वाटून अलिप्तता जाणवायची; परंतु आता त्यांना चुकांविषयी खंत वाटते. ते सकारात्मक राहून चूक पुन्हा न होण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्यातील व्यापकत्व वाढल्याचे लक्षात येते.
‘परात्पर गुरु डॉक्टर, ‘आपल्याच कृपेमुळे श्री. निनाद यांचे गुण आमच्या लक्षात आले आणि आपणच ते लिहून घेतलेत’, याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती मनीषा गाडगीळ (आई, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६० वर्षे), सौ. तनुजा निनाद गाडगीळ (पत्नी, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि सौ. नम्रता राजेंद्र दिवेकर (बहीण) सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.५.२०२१)