‘लव्ह जिहाद’विषयी कायदा आणण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली आहे ! – चित्रा वाघ, प्रदेशाध्यक्ष, भाजप

चित्रा वाघ

कोल्हापूर, १४ डिसेंबर (वार्ता.) – संपूर्ण राज्यात ‘लव्ह जिहाद’चा प्रश्न पेटलेला आहे. १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींच्या संदर्भात जे काही घडत आहे, ते अत्यंत भयानक आहे. १३/१४ वर्षांच्या मुली आज गर्भवती रहात आहेत. ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणातून ज्या मुलींवर अत्याचार होतात त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची कोणतीच तरतूद सध्याच्या कायद्यात नाही. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा होण्यासाठी ‘लव्ह जिहाद’विषयी कायदा आणावा, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे, अशी माहिती भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सौ. चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक, गायत्री देसाई उपस्थित होत्या.

१. विनयभंगांच्या गुन्ह्यांकडे अत्यंत गांभीर्याने पहायला हवे. प्राथमिक टप्प्यावर असे गुन्हे करणार्‍यांना कठोर शिक्षा न झाल्यास त्यांचे धाडस वाढते आणि पुढे जाऊन ते भयंकर गुन्हे करण्यास प्रवृत्त होतात.

२. मुली-महिला यांच्यावर अत्याचार होतांना समाज शांत रहातो, हे अत्यंत चुकीचे आहे. अशा घटना थांबवणे, हे समाजाचेही दायित्व आहे. ज्या ज्या वेळी अयोग्य घटना घडते, त्या त्या वेळी समाजाने पुढाकार घेऊन अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. निर्भया पथकांचा पहारा परत एकदा वाढवण्याची आवश्यकता आहे.

३. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शिंदे-फडणवीस यांचे सरकार अत्यंत गंभीर आहे. अशा अत्याचारांच्या गुन्ह्यांत कसूर करणार्‍या एक डझनपेक्षा अधिक पोलीस अधिकार्‍यांना आमच्या सरकारने निलंबित केले आहे. मुंबईत कोरीया येथील युवतीची छेडछाड करणार्‍यांवर आमच्या सरकारने तात्काळ कारवाई केली.

४. कोल्हापूर येथे ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात जी घटना उघडकीस आली त्या संदर्भात आम्ही येथील पोलीस अधीक्षकांना भेटणार असून यात दिरंगाई झाली का ? हेही आम्ही पहाणार आहोत. या संदर्भातही कठोर कारवाईची मागणी आम्ही करणार आहोत.