हरियाणात आता न्यायालयीन आदेश हिंदीतून मिळणार !
राजभाषा कायदा दुरुस्तीला राज्यपालांची संमती
चंढीगड – भाजपशासित हरियाणामध्ये आता न्यायालयीन आदेशाची प्रत हिंदी भाषेत मिळणार आहे. हरियाणा सरकारच्या हिंदी राजभाषा कायदा दुरुस्तीला हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी संमती दिली असून १ एप्रिल २०२३ पासून राज्यात हा पालट लागू करण्यात येणार आहे.
हरियाणा सरकारने लोकांची सोय लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. हरियाणात लोक दैनंदिन जीवनात हिंदी भाषेचा वापर करतात. हिंदी हरियाणा राज्याची अधिकृत भाषा असून ती ‘प्रशासकीय भाषा’ही आहे. न्यायालयाचा आदेश इंग्रजी भाषेत आल्यावर स्थानिक लोकांना तो वाचण्यात फार अडचण येत होती. या संदर्भात अनेक तक्रारी सरकारकडे करण्यात आल्या होत्या. त्यानंतर हरियाणाच्या मंत्रीमंडळाने जानेवारी २०२२ मध्ये राजभाषा कायदा दुरुस्तीच्या प्रस्तावाला संमती दिली होती.