कोरोना महामारीच्या काळात साधकाने अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !
‘मार्च २०२० पासून चालू असलेल्या कोरोना महामारीच्या काळात परात्पर गुरुदेवांनी माझी प्रत्येक प्रसंगात काळजी घेतली. तेव्हा गुरुदेवच देवाचे स्थूल रूप असल्याची मला प्रत्येक प्रसंगात प्रचीती आली.
१. पूर्वी नोकरी करत असलेल्या आस्थापनाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने दुसरी नोकरी धरणे, कोरोना महामारी चालू झाल्यामुळे पहिले आस्थापन नेहमीसाठीच बंद होणे, तेव्हा ‘गुरुकृपेनेच या संकटातून वाचलो’, याची जाणीव होणे
मी नोकरी करत असलेल्या आस्थापनाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने ‘आता आपण दुसरी नोकरी शोधायला हवी’, असा विचार माझ्या मनात आला. लगेच डिसेंबर २०१९ मध्ये मी माझ्या नोकरीचे त्यागपत्र देऊन दुसर्या आस्थापनात नोकरीसाठी रुजू झालो. त्यानंतर ३ मासांत कोरोना महामारीत दळणवळण बंदी चालू झाल्यावर ‘जुने आस्थापन नेहमीसाठीच बंद झाले’, असे मला कळले. या ३ मासांच्या सर्व घडामोडींमध्ये ‘जुने आस्थापन सोडण्याचा विचार मनात येऊन मला लगेच दुसर्या आस्थापनात नोकरी मिळणे, हे केवळ गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने शक्य झाले’, याची मला जाणीव झाली.
२. कोरोनाच्या महामारीच्या कालावधीत दळणवळण बंदीमुळे नवीन आस्थापन बंद पडल्यावर तीन मास कामावर जाता न येणे, तरीही ‘मालकाने त्या तीन मासांतील अर्धे वेतन देणे’, हे गुरुकृपेमुळेच होणे
नवीन आस्थापनात नोकरी करायला लागून जेमतेम अडीच मास झाले आणि कोरोना महामारीमुळे मार्च मासात दळणवळण बंदी चालू झाली. त्यानंतर जवळपास ३ मासांनी आस्थापन चालू झाले. तोपर्यंत म्हणजे ३ मास मी घरीच होतो, तरीही आस्थापनाच्या मालकाने स्वतः संपर्क करून मला या कालावधीतील अर्धे वेतन देऊ केले. हे केवळ गुरुदेवांच्या कृपेनेच होऊ शकले. त्यामुळे माझी संभाव्य आर्थिक अडचण टळली.
३. गुरुदेवांच्या कृपेने दळणवळण बंदीच्या तीन मासांच्या काळात घरासमोर आपत्काळाच्या दृष्टीने आवश्यक भाजीपाला लावता येणे आणि बागेत आध्यात्मिक उपाय केल्यामुळे त्याचा वनस्पतींवर चांगला परिणाम दिसून येणे
दळणवळण बंदीच्या ३ मासांच्या काळात गुरुदेवांच्या कृपेने माझ्याकडून घरासमोरील जागेत आपत्काळाच्या दृष्टीने आवश्यक भाजीपाला पिकवण्याच्या संदर्भात प्रयत्न झाले. ‘सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला कसा पिकवावा ?’, या संदर्भातील माहिती मला माहितीजालावरून उपलब्ध झाली. सेंद्रीय पद्धतीने खते सिद्ध करून त्यांचा वापर केल्यावर अधिक चांगले परिणाम दिसून आले. या सर्व गोष्टी करत असतांना मी ‘बागेत नामजप आणि विविध स्तोत्रे लावणे, तसेच देशी गायींच्या शेणापासून सिद्ध केलेल्या गोवर्यांचा धूप (धूर) करणे’, असे प्रयत्न केले. या सर्वांमुळे त्या जागेतील वनस्पतींवर झालेले चांगले परिणाम मला अभ्यासता आले. गुरुदेवांनी सूक्ष्मातून सुचवल्याप्रमाणे बागेत केलेल्या उपायांमुळे त्या जागेत चांगली स्पंदनेही जाणवू लागली. मला कुठलाही पूर्वानुभव नसतांना केवळ गुरुदेवांच्याच कृपेने मला हे सर्व करणे शक्य झाले.
४. गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे नियमित नामजपादी उपाय केल्यामुळे बाहेरील स्थितीचे भय न रहाता घरातील वातावरण आणि मन शांत होण्यास साहाय्य होणे
गुरुदेवांच्या कृपेने दळणवळण बंदीच्या काळात सकाळी आणि संध्याकाळी असे २ वेळा नियमित शरिराभोवतीचे आवरण काढणे, कोरोनाच्या प्रतिबंधनासाठी आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी सांगितलेला नामजप करणे, घरात विविध स्तोत्रे लावणे आणि गोवर्यांचा धूप करणे, या सर्व कृती केल्यामुळे घरातील वातावरण अन् मन शांत रहात होते. कोरोना महामारीमुळे बाहेरील स्थिती गंभीर असतांनाही गुरुदेवांनी करवून घेतलेल्या या सर्व कृतींमुळे मला कसलेही भय वाटत नव्हते. ‘नामजप आणि उपाय यांच्या माध्यमातून गुरुदेव सतत समवेत आहेत’, असे मला जाणवत होते. हे उपाय ३ मास सातत्याने केल्यामुळे ‘आता हे सर्व करणे’, हा माझ्या दिनचर्येचा एक भागच बनून गेला आहे.
५. नोकरी निमित्त ४ घंट्यांचा प्रवास करावा लागणे, तेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सतत जवळच आहेत’, याची जाणीव होऊन प्रवासाचा शीण न येणे
जुलै मासापासून आस्थापन चालू झाल्यावर मला प्रतिदिन जवळपास ४ घंट्यांचा प्रवास करायला लागतो. आरंभीच्या काळात परिस्थिती फारच गंभीर होती; परंतु अशा परिस्थितीतही दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये येणार्या ‘कोरोनाच्या संदर्भातील सर्व सूचनांचे पालन करणे, प्रवासात नामजप आणि उपाय करणे’, यांमुळे मला कधीच कसलेही भय वाटले नाही. त्या वेळी ‘गुरुदेव आपल्या समवेत आहेत’, याची मला क्षणोक्षणी जाणीव व्हायची. गुरुदेवांनीच माझ्याकडून हे सर्वकाही करून घेतले. बाहेरील परिस्थिती पाहिल्यावर ‘गुरुदेवांच्या कृपेमुळे आपण जिवंत आहोत’, याची मला सतत प्रचीती यायची.
६. स्थुलातून उपाय करता आले नाहीत, तरी नुसते डोळे मिटून गुरुदेवांचे रूप डोळ्यांसमोर आणल्यावर आध्यात्मिक लाभ होऊन हलके वाटणे
मला नोकरीनिमित्त पनवेलहून मुंबईला जावे लागते. मला तेथील रज-तमात्मक वातावरणामुळे आवरण येते. कधी कधी मी कामात व्यस्त असल्याने मला स्थुलातून उपाय करता येत नाहीत. तेव्हा काही क्षण थांबून डोळे मिटून गुरुदेवांचे रूप डोळ्यांसमोर आणल्यावरही आध्यात्मिक लाभ होऊन मला पुष्कळ हलके वाटते.
७. मागील ७ वर्षांपासून नोकरीमुळे सनातन संस्थेशी निगडित कुठल्याही सेवेत सहभागी नसलो, तरी ‘गुरुदेव सतत जवळच आहेत’, अशी अनुभूती येणे
प्रापंचिक अडचणींमुळे मी गेल्या ७ वर्षांपासून नोकरी करत आहे. तेव्हापासून मी सनातन संस्थेशी निगडित कुठल्याही सेवेत सहभागी झालो नाही. असे असूनही या संपूर्ण कालावधीत ‘मी गुरुदेवांपासून दूर गेलो आहे’, असे मला कधीच जाणवले नाही. त्यांनी प्रत्येक वेळी माझी काळजी घेतली. या सर्वांमुळे मन कृतज्ञतेने भरून येते आणि पुढील ओळ मनात येते,
‘परात्पर गुरु डॉक्टर माझी माऊली, असे कल्पवृक्षाची सावली ।’
‘गुरुदेवा, तुमची माझ्यावर अशीच कृपा राहू दे. माझ्याकडून आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न होऊ देत’, हीच तुमच्या चरणी कळकळीची प्रार्थना !’
– आपला कृपाभिलाषी,
श्री. शशिकांत शहाजी कुंभार, देवद, पनवेल. (११.८.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |