पतीला आश्रमात पूर्णवेळ राहून साधना करण्यास सर्वतोपरी साहाय्य करणार्या आणि गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर स्थिर राहून कठीण प्रसंगांना सामोरे जाणार्या खानापूर (जिल्हा बेळगाव) येथील सौ. पूजा परशुराम पाटील !
पतीला आश्रमात पूर्णवेळ राहून साधना करण्यास सर्वतोपरी साहाय्य करणार्या आणि गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर स्थिर राहून कठीण प्रसंगांना सामोरे जाणार्या खानापूर (जिल्हा बेळगाव) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पूजा परशुराम पाटील !
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम पाटील यांना त्यांची पत्नी ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पूजा पाटील यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. आश्रमात पूर्णवेळ साधनेला जाण्यासाठी यजमानांना अनुमती देणे
‘सौ. पूजा लहानपणापासून कर्मकांड, देवपूजा अगदी मनापासून करायची. पूर्वी तिला साधनेतील ‘स’ही ठाऊक नव्हता; पण ‘मी पूर्णवेळ आश्रमात रहाण्यास जाऊ का ?’, असे विचारल्यावर तिने सकारात्मकतेने होकार दिला.
२. पतीला साधना करण्यासाठी आश्रमात रहाण्यास सांगणे आणि घर अन् मुले यांच्या संदर्भातील कर्तव्ये प्रेमाने पार पाडणे
पूजा वयाने लहान असूनही तिने साधारण वर्ष २००३ पासून नोकरी करून दोन्ही मुलांना लहानाचे मोठे केले. मी जेव्हा पूर्णवेळ साधना करू लागलो, तेव्हा माझा एक मुलगा ‘ॐ’ (ओम्) एक वर्षाचा आणि दुसरा मुलगा सूरज ५ वर्षांचा होता. इतक्या लहान वयाची मुले असतांना घरी तिच्या समवेत कुणीच नव्हते. घरातील सर्व कामे आवरून आणि मुलांना सांभाळून ती नोकरीला जायची. ‘मी घरी यावे’, यासाठी तिने कधीच हट्ट केला नाही. मी सतत म्हणायचो, ‘‘आपली मुले लहान आहेत. मी घरी येऊ का ?’’ त्यावर ती मला स्पष्ट नकार द्यायची आणि सांगायची, ‘‘तुम्ही साधनाच करा आणि आश्रमात रहा. मी इकडची बाजू सांभाळते. तुम्ही साधना केलेलीच मला आवडेल. मी माझे कर्तव्य प्रेमाने करीन. तुम्ही काळजी करू नका.’’
३. साधना आणि नामजप यांविषयी सांगितल्यावर नामजप करायला प्रारंभ करणे
तिने कुटुंबाचे दायित्व व्यवस्थितपणे पार पाडले आहे. मी पूर्णवेळ साधक झाल्यानंतर प्रारंभी आठवड्यातून एकदा घरी जायचो. घरच्या अडचणी बघून दुसर्या दिवशी परत आश्रमात यायचो. काही दिवसांनंतर मी तिला थोडी साधना सांगू लागलो. ‘साधना म्हणून नामजप करायचा असतो’, असे मी तिला सांगितले. तिला ते कळल्यावर ती लगेच तत्परतेने साधना म्हणून नामजप करू लागली. त्यानंतर तिला साधना समजल्यावर ती मला म्हणाली, ‘‘तुम्ही आठवड्याला घरी न येता १५ दिवसांनी घरी या.’’
४. सेवेचे महत्त्व सांगितल्यावर प्रासंगिक सेवा करू लागणे आणि साधकांशी जवळीक साधणे
काही दिवसांनी मी तिला सेवेचे महत्त्व सांगितले आणि ‘ती कशी करायची ?’, हे सांगितले. सेवा सांगितल्यानंतर ती प्रासंगिक सेवेला जाऊ लागली. ती गुरुपौर्णिमेच्या सेवा करू लागली. गावात हिंदु राष्ट्र-जागृती सभा असेल, तर ती सभेची सेवा करू लागली. ती सभेला आणि गुरुपौर्णिमेला दोन्ही मुलांना घेऊन जायची. थोड्या दिवसांनी तिचे कर्मकांड न्यून झाले आणि तिच्यात साधनेची आवड निर्माण होऊ लागली. सेवा करतांना तिची साधकांशी ओळख झाली. तिने साधकांशी जवळीक केली आणि ती साधकांच्या समवेत आनंदाने सेवा करू लागली.
५. वर्ष २००६ नंतर साधना आणि सेवा यांचे महत्त्व पटल्याने तिला साधनेत आनंद मिळू लागला अन् त्यानंतर मी २० दिवसांतून एकदा आश्रमातून घरी जाऊ लागलो.
६. देवावरील श्रद्धेच्या बळावर स्थिर राहून प्रतिकूल प्रसंगांनाही सामोरे जाणे
६ अ. गांधीलमाश्यांनी आक्रमण केले असता शेजार्यांचे साहाय्य घेऊन आधुनिक वैद्यांकडे जाणे आणि या परिस्थितीत कोणतेही गार्हाणे न करता स्थिर रहाणे : वर्ष २००५ – २००६ मध्ये एकदा जंगलात लाकडे आणण्यासाठी एकटी गेल्यानंतर जंगलातील गांधीलमाश्यांनी तिच्यावर आक्रमण केले. त्या वेळी तिने घरी येऊन शेजार्यांचे साहाय्य घेतले आणि ती खासगी आधुनिक वैद्यांकडे गेली. त्यांनी तिला भरती करून घेतले नाही. त्यानंतर ती त्या अवस्थेत न डगमगता सरकारी आधुनिक वैद्यांकडे गेली. त्या वेळी ती जराही घाबरली नाही. तेव्हा आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘अजून दोन माश्या चावल्या असत्या, तर तुमचा प्राण जाण्याची शक्यता होती.’’ अशा स्थितीत तिला माझ्या आधाराची आवश्यकता असूनही तिने मला कळवले नाही. या सर्व प्रसंगात ती स्थिर होती. तिने कोणतेही गार्हाणे केले नाही. थोड्या दिवसांनी पूर्वस्थितीत आल्यावर तिने मला वरील सर्व प्रसंग सांगितला. प्रत्येक प्रसंगात ती मला सतत म्हणायची, ‘‘देव माझी काळजी घेतो. तुम्ही तिकडे आश्रमात राहून आनंदाने साधना करा.’’
६ आ. पतीच्या साधनेत अडचण येऊ नये; म्हणून मुलाचा अपघात झाल्यावर त्याविषयी पतीला न कळवणे आणि देव काळजी घेत असल्याचे सांगणे : मुले आजारी असल्यास अथवा घरी काही अडचण आल्यास ती मला न कळवता सर्व अडचणी सोडवत असे. घरी कोणतीही अडचण आली, तरी ती कधीच कटकट करत नसे. ‘तुम्ही साधना करा. मी सर्व बघते’, असेच ती सांगायची. माझा धाकटा मुलगा ‘ॐ’ (ओम्) एक वर्षाचा होता. तो रांगत असतांना त्याचा हात विळीवर पडून त्याच्या हाताला मोठी जखम झाली. त्या वेळी ती न डगमगता स्वतःच त्याला आधुनिक वैद्यांकडे घेऊन गेली आणि औषधोपचार केले. माझ्या साधेनत अडचण येऊ नये; म्हणून तिने बरेच दिवस हा प्रसंग मला सांगितला नाही. काही दिवसांनी तिने झालेला प्रसंग मला सांगितला. त्या वेळी मी तिला विचारले, ‘‘मला का कळवले नाहीस ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘तुम्ही इकडे येऊन जे केले असते, तेच मी केले. माझ्या समवेत देव आहे. तुम्ही देवाचे करता. त्यामुळे देव माझी काळजी घेईल आणि मला साहाय्य करील.’’(क्रमश:)
– श्री. परशुराम पाटील (पती) (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(२३.१०.२०१९)
आध्यात्मिकदृष्ट्या एक आदर्श पती-पत्नी म्हणजे रामनाथी आश्रमातील श्री. परशुराम आणि खानापूर (जिल्हा बेळगाव) येथील सौ. पूजा पाटील !‘हल्लीच्या काळात पती-पत्नी यांच्यात प्रेमापेक्षा भांडणेच अधिक असतात. असे असतांना ‘साधक पती-पत्नीचे एकमेकांशी संबंध कसे असावेत’, याचे एक अप्रतिम उदाहरण सौ. पूजा पाटील यांच्या संदर्भात त्यांचे पती श्री. परशुराम पाटील यांनी पुढील लेखाद्वारे दिले आहे. ‘अशा आदर्श पती-पत्नीप्रमाणे आपणही आहोत का ?’, असा विचार साधकांनी करणे आवश्यक आहे. ‘त्या दोघांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल आणि ते दोन्ही मुलांकडून साधनाही करून घेतील’, याची मला खात्री आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/636400.html