रणरागिणी शाखेच्या शिष्टमंडळाकडून महिला आणि बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट !
मुंबई – महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि धर्मांतर रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, या मागणीसाठी १४ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या शिष्टमंडळाने महिला आणि बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेतली. या वेळी चित्तपावन ब्राह्मण संघाच्या सौ. अनघा बेडेकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सौ. रमा सावंत, रणरागिणी शाखेच्या मुंबई समन्वयक वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे आणि सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर अन् सौ. शर्मिला बांगर या उपस्थित होत्या.
लव्ह जिहादच्या माध्यमातून युवतींची होत असलेली फसवणूक, तसेच ख्रिस्ती मिशनर्यांद्वारे आमीष दाखवून आणि बळजोरीने होत असलेले धर्मांतर यांविषयीची माहिती देऊन शिष्टमंडळाने राज्यात या विरोधात कायदा करण्याची मागणी मंत्री लोढा यांच्याकडे केली. याविषयीची निवेदनेही शिष्टमंडळाकडून लोढा यांना देण्यात आली.
नागपूर येथील आंदोलनात सहभागी होईन ! – मंगलप्रभात लोढा, महिला आणि बाल विकासमंत्री
नागपूर येथे २१ डिसेंबर या दिवशी लव्ह जिहादविरोधी कायदा आणि धर्मांतरबंदी कायदा करण्याच्या मागणीसाठी काढण्यात येणार्या मोर्च्यामध्ये मी सहभागी होईन, असे आश्वासन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या वेळी सांगितले. हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने हा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.