कर्नाटकातील कलबुर्गी रेल्वे स्थानक हिरव्या रंगाने रंगवल्यामुळे हिंदु संघटनांचा विरोध !

हिंदूंच्या विरोधानंतर रेल्वे स्थानकाचा रंग पालटण्याचा प्रशासनाचा निर्णय

कलबुर्गी (कर्नाटक) – कर्नाटकातील कलबुर्गी रेल्वे स्थानकाची इमारत हिरव्या रंगाने रंगवल्याने वाद निर्माण झाला आहे. कलबुर्गी रेल्वे स्थानकाच्या या हिरव्या रंगावर हिंदु संघटनांनी तीव्र आक्षेप घेत याविरोधात निदर्शनेही केली.

‘कलबुर्गी रेल्वे स्थानक हिरव्या रंगाने रंगवल्यामुळे ते मशिदीसारखे दिसत आहे’, असे सांगत हिंदू जागृती सेना आणि इतर हिंदु संघटना यांनी त्याला विरोध केला होता. हिंदु संघटनांच्या विरोधानंतर रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानक इमारतीचा रंग पालटण्याचा निर्णय घेतला आहे. (रेल्वे स्थानकाची रंगरंगोटी करतांना ‘त्यातून कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात नाही ना ?’ किंवा ‘त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होणार नाही ना ?’, याचा विचार रेल्वे प्रशासनाने करणे अपेक्षित आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणी अन्वेषण करून उत्तरदायी अधिकार्‍यांवर तात्काळ कारवाई करावी, जेणेकरून असे प्रकार पुन्हा घडणार नाही ! – संपादक) प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आता कलबुर्गी रेल्वे स्थानक इमारतीचा हिरवा रंग पालटून पांढरा करण्यात येत आहे.