‘धर्मवीर’ : सद्यःस्थितीचे वास्तव दर्शवणारा मराठी चित्रपट !
नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘धर्मवीर’ हा मराठी भाषेतील चित्रपट पहाण्यात आला. दिवस-रात्र केवळ ‘राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कसे कार्य करावे ?’, हे सांगणारा हा चित्रपट अतिशय चांगला आहे. दिवंगत आनंद दिघे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना कसे सज्ज केले ? त्यांच्यातील संघटनकौशल्य आदी गोष्टी या चित्रपटातून शिकण्यासारख्या आहेत.
आजच्या निद्रिस्त हिंदूंची स्थिती दर्शवणारा प्रसंग
या चित्रपटात क्षात्रवृत्ती जागृत करणारा एक प्रसंग दाखवण्यात आला आहे. त्यात ‘अनेक मुसलमान तलवारी, मशाली, आम्ल (ॲसिड) घेऊन एक हिंदु महिला आणि तिच्या लहान मुलाला मारायला अन् त्यांचे घर जाळायला येतात. त्या वेळी ती वाघिणीप्रमाणे मुसलमानांशी एकटीच लढते. कोयता घेऊन अनेकांना मारते आणि स्वतःसह बाळाचे रक्षण करते. त्यानंतर आनंद दिघे आणि त्यांचे कार्यकर्ते तिला वाचवतात. ते नंतर आजूबाजूच्या निद्रिस्त हिंदूंना तिच्या रक्षणासाठी पुढे न आल्याविषयी खडसावतात. ते हिंदू आजच्या निद्रिस्त हिंदु समाजाची स्थिती दर्शवतात.
न्यायव्यवस्थेचे चित्रण
आनंद दिघे हे लोकांच्या समस्या सोडवायचे आणि त्यांना न्याय मिळवून द्यायचे. ‘पुरावे नष्ट करणे आणि खोटी साक्ष देणे यांमुळे न्याय मिळत नसून अन्यायच होतो’, हे एका प्रसंगातून दाखवले आहे. यात ‘बलात्कार करणारा सुटतो आणि पीडित मुलगी दीड वर्षे न्यायालयात जाऊन अन्याय झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या करते’, असे दाखवले आहे. तेव्हा आनंद दिघे हे एका दिवसात न्याय देतात. शेवटी आनंद दिघे हे त्या मुलीला वाचवू शकले नाहीत; म्हणून पीडित मुलीच्या आई-वडिलांची क्षमायाचना करतात. हा प्रसंग पुष्कळ काही सांगून जातो.
या वेळी मला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ‘पोलीस आणि न्यायाधीश यांना साधना शिकवली असती, तर त्यांना एका क्षणात ‘गुन्हेगार कोण आहे’, हे कळले असते. साधनेअभावी जनतेचे कोट्यवधी रुपये केवळ तपासासाठी खर्च होत आहेत. ईश्वरी राज्यात असे नसेल’, या तेजस्वी विचारांचे स्मरण झाले.
स्वपक्षातील भ्रष्टाचारी नगरसेवकाला शिक्षा
दिघे यांच्याच पक्षाचा एक कार्यकर्ता नगरसेवक झाल्यावर ६ मासांत नवीन गाडी घेतो. तेव्हा भ्रष्टाचार केला; म्हणून दिघे हे त्याला चोपतात, हाही प्रसंग दाखवण्यात आला आहे. आनंद दिघे यांचा त्यांच्या गुरूंप्रती भावही दाखवण्यात
आला आहे.
– श्री. अश्विन गावकर, पर्वरी, गोवा.