आतापर्यंत ९ सहस्र ८५७ तारांकित प्रश्न, तर १ सहस्र २१७ लक्षवेधी जमा !
मुंबई – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आतापर्यंत ९ सहस्र ८५७ तारांकित प्रश्न, तर १ सहस्र लक्षवेधी लोकप्रतिनिधींकडून आल्या आहेत. यामध्ये विधानसभेसाठी ६ सहस्र ८४७ तारांकित प्रश्न, तर ८८७ लक्षवेधींचा समावेश आहे, तर विधान परिषदेच्या ३ सहस्र १० तारांकित प्रश्न आणि ३३० लक्षवेधींचा समावेश आहे.
यामध्ये यापूर्वीचे प्रलंबित आणि या वेळच्या अधिवेशनासाठी प्राप्त झालेले प्रश्न यांचा समावेश आहे. या अधिवेशनामध्ये अनुमाने २१ विधेयके चर्चेसाठी येणार आहेत.
१९ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणार अधिवेशन !
मुंबईमध्ये विधीमंडळामध्ये १३ डिसेंबर या दिवशी विधानसभेच्या कामकाज समितीची बैठक अध्यक्ष राहुल नार्वेकर, तर विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अन्य मंत्री, विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत उपस्थित होते.