आरोग्याला प्राधान्य हवे !
सध्याच्या स्पर्धेच्या युगात स्वतःचे ‘करिअर’ आणि स्वतः ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी धावपळ चालू असते. ही धावपळ करत असतांना कुणालाही व्यायाम करणे वा आरोग्याकडे लक्ष देणे यांसाठी वेळ मिळत नाही. त्याचसह अनेकांची कामे ही बैठ्या स्वरूपाची असल्याने स्नायूंची हालचालही अल्पच असते. त्यामुळे बहुतांश जणांना आरोग्याच्या समस्या असतात. या समस्या कशा प्रकारच्या असतात आणि त्या टाळण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करायला हवेत, याविषयीची विविध उदाहरणे येथे दिली आहेत.
१. पैसे वाचवण्यासाठी आरोग्याकडे दुर्लक्ष करणारे श्रीमंत दांपत्य !
सदानंद रांगणेकर, वय वर्षे ५६. उत्तम नोकरी, कमावती पत्नी, दोन मोठी घरे, दोन गाड्या, मुले विदेशात कमावती, देवदयेने ‘पांचो उगलिया घी में और कढईमें’, अशी परिस्थिती होती. १ मासापूर्वी त्यांना डेंग्यू झाला होता. रुग्णालयात ८ दिवस राहिल्यावर ते बरे झाले; पण अशक्तपणा अजूनही टिकून राहिल्याने ‘आयुर्वेदाचे उपचार घ्यावेत’, असे ठरवून ते माझ्याकडे आले होते. ‘‘१ मास तरी औषध घ्यावे लागेल. त्याने बरे वाटेल’’, असे मी त्यांना सांगितले.
सौ. रांगणेकर म्हणाल्या, ‘‘अहो, ते तुमच्या गुडघ्याचेही सांगा ना !’’ मग ‘बरे झाले आठवले’, या अर्थाचा अभिनय करून रांगणेकरांनी गुडघ्याची गोष्ट सांगितली. त्या अनुषंगाने त्यांची १५ वर्षांपासून चालू असलेली फिरती, मणक्याचे आजार, मूळव्याध, नैराश्य… अशा लांबलचक समस्या समोर आल्या. ‘‘तुमच्या समस्या पुष्कळ अधिक आणि जुन्या आहेत. या सगळ्यांवर किमान वर्षभर तरी उपचार घ्यावे लागतील’’, असे मी म्हणताच दोघेही गांगरले. बरीच अवतीन्भवती करून आणि माझा घंटाभर वेळ घेऊन ‘बघतो पैशांचा विचार करून आणि मुलांना विचारून सांगतो’, असे म्हणून ते निघून गेले. ६ मासांनी ते परत माझ्याकडे आले. तेव्हा त्यांच्या आरोग्याची अवस्था अधिकच बिकट झाली होती. या कालावधीत ढीगभर तपासण्या आणि एक अयशस्वी शस्त्रक्रिया यांवर लाखभर रुपये व्यय झाला होता. अशा रितीने वेळ आणि पैसा या दोन्हींची तंगी घेऊन ते आयुर्वेदाकडे आशेने बघत होते.
२. निवृत्तीनंतरचे सर्व लाभ मिळण्यासाठी शारीरिक त्रासांकडे दुर्लक्ष करून स्वेच्छानिवृत्ती टाळणारी नोकरदार महिला !
आशा देशपांडे यांना निवृत्त व्हायला २ वर्षे शिल्लक असतांना त्यांचे बडोद्याला स्थानांतर झाले. बढती मिळाल्यामुळे कामाचे स्वरूप पालटले होते. त्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक ताण आला होता. त्यात भर म्हणजे कुटुंबापासून दूर आणि नवीन शहर असल्याने त्यातून आलेला एकटेपणाही भेडसावत होता. आशाताईंना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या छळू लागल्या.
‘‘अहो, स्वेच्छानिवृत्ती घ्या की. सर्व प्रश्न सुटतील’’, असा सल्ला मी त्यांना दिला. तेव्हा अगदी काकुळतीला येऊन त्या म्हणाल्या, ‘‘नाही जमणार हो.’’ मी आश्चर्याने विचारले, ‘‘का ? काही आर्थिक समस्या आहे का ? त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘छे छे ! सगळं काही गडगंज आहे; पण हे (यजमान) आणि मुले म्हणतात की, दोन वर्षे काढ की आता. हत्ती गेला आणि शेपूट राहिले आहे. पुढील सर्व लाभ तरी मिळतील. नाहीतरी घरी बसून काय करणार ?’’ म्हणजे आशाताईंच्या आरोग्यापेक्षा निवृत्तीनंतरचे लाभ सर्वांना अधिक महत्त्वाचे वाटत होते.
३. ‘करिअर’साठी आरोग्याला प्राधान्य न देणारे तरुण जोडपे !
अमोल आणि अमृता अगदी गोड जोडपे ! अमृताच्या तिशीत त्यांचा विवाह झाला. प्रथम ३-४ वर्षे झरकन् गेली. अजून घरात पाळणा हलला नव्हता. मी म्हटले, ‘‘दोन मासांचा वेळ देऊन पंचकर्म करून घ्या.’’ त्याच वेळी अमृताला नवीन आस्थापनात चांगली संधी मिळत होती आणि अमोललाही स्वित्झर्लंडची ‘ग्रेट ऑफर’ होती. त्यामुळे दोघेही वेगवेगळे रहाणार होते, म्हणजे पुन्हा भिजत घोंगडं ! करिअर आणि आरोेग्य यातून नि:संदिग्धपणे त्यांनी ‘करिअर’ची निवड केली होती.
४. व्यायामासाठी थोडा वेळ न काढणार्या लोकांना आजारासाठी भरपूर वेळ काढावा लागत असणे
जितेंद्र पोतदार हा तरुण अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला आहे. हुशार आणि मेहनती. त्याला पुढे शिकण्यासाठी विदेशात जायचे होते; पण आई-वडिलांना त्याच्या प्रकृतीची काळजी होती. अगदीच बारीक तब्येत ! प्रत्येक ऋतू पालटला की, हा आजारी पडतो. रोगप्रतिकारशक्ती अतिशय अल्प. गेली ३ वर्षे मी त्याला सांगत आहे, ‘‘प्रतिदिन ४० मिनिटे व्यायाम तुला आवश्यक आहे.’’ पण याला वेळच मिळत नाही. प्रत्येक वेळी त्याचे दैनंदिन वेळापत्रक तो मला बिनदिक्कतपणे ऐकवतो आणि विचारतो, ‘‘आता सांगा, यात व्यायामाला वेळ कसा काढू ?’’ मीही प्रत्येक वेळी तितक्याच ठामपणे सांगते, ‘‘बाबा रे, तू प्रतिदिन ४० मिनिटे अभ्यास अल्प केलास, तर तुझी मोठी हानी होईल, असे नाही; पण व्यायाम केला नाहीस, तर मोठी हानी होईल. जे लोक व्यायामासाठी थोडा वेळ काढत नाहीत, त्यांना आजारासाठी भरपूर वेळ काढावा लागतो.’’ जितेंद्रला ते अजून पटायचे आहे.
५. मुलांच्या अभ्यासाला अवाजवी महत्त्व देऊन त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष करणारे पालक !
सारिका म्हात्रे, इयत्ता १० वीतील मुलगी. ‘पाठ दुखते आणि कंटाळा येतो’, ही तक्रार घेऊन आवश्यक-अनावश्यक सर्व तपासण्या करून ती आईसमवेत माझ्याकडे आली. इयत्ता ९ वी आणि १० वीच्या सर्व युवकांप्रमाणे तिची बैठी जीवनशैली होती. पालक ‘मार्क्स’वादी झाल्याने अभ्यासाला अवास्तव महत्त्व. मुलांनी केवळ अभ्यास करावा; म्हणून पालक त्यांना घरातील कुठलेही काम करू देत नाहीत. मुलांनी स्वत: करायची कामेही प्रसंगी पालक करतात. प्यायचे पाणीही हातात आणून देतात. शरिराला काहीच हालचाल नाही म्हटल्यावर स्नायू दुखणारच. मी सारिकाला व्यायामाचे महत्त्व समजावून सांगितले. तीही इतकी चुणचुणीत निघाली की, माझ्या सल्ल्यानुसार दुसर्याच दिवशी सकाळी उठून ती सूर्यनमस्कार घालू लागली.
आठवडाभराने तिचे वडील तिला घेऊन माझ्याकडे आले. सारिका आनंदी होती. तिची पाठ दुखायची थांबली होती आणि अभ्यासातील उत्साहही वाढला होता; पण तिचे वडील नाखूश होते. ते मला म्हणाले, ‘‘ते सगळे ठीक आहे हो. सारिका आता पहाटे लवकर उठतेही; पण ती सकाळी पुष्कळ वेळ वाया घालवते. अभ्यास करायचा सोडून काहीतरी सूर्यनमस्कार घालत बसते.’’ यावर मी काय बोलणार ?
६. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी इंद्रियनिग्रह करून पथ्यपालन करणे आवश्यक !
आज सर्वांची मानसिकता थोड्या फार फरकाने अशीच असते. अभ्यास, स्पर्धा, नोकरी, व्यवसाय, पैसा, प्रतिष्ठा अशा सगळ्याच गोष्टींना आज माणसाच्या आयुष्यात अवाजवी महत्त्व प्राप्त झाले आहे. या सूचीत आरोग्याचे स्थान ७ व्या-८ व्या क्रमांकावर जाते. आजार दीर्घकाळ अंगावर काढले जातात. औषधे चालू केली, तरी वेळेवर घेतली जात नाहीत. थोडे बरे वाटले की, आपल्याच मनाने औषधे बंद केली जातात. पथ्यपालन करण्याइतका इंद्रियनिग्रह तर दुर्मिळ झाला आहे. मग एक लहानसा आजारही विनाकारण लांबत जातो किंवा एका आजारातून दुसरा आजार उद्भवतो.
७. महिलांनी अन्य सर्व गोष्टींमधून वेळ काढून आरोग्याला महत्त्व देणे आवश्यक !
महिलांची चिकित्सा हा तर जणू त्यांचा फावल्या वेळेचा किंवा करमणुकीचा भाग असतो. त्यामुळे त्यांची चिकित्सा दूरचित्रवाहिनीच्या मालिकांसारखी चालते. थोडे उपचार की, मग मोठा खंड असे दळण चालू असते. बरं, तो खंड पडायला कारणेही कशी भारी असतात ! पाहुणे, आजारपण, रजा हे तरी ठीक असते; पण जून मासात मुलांच्या शाळेचा व्यय असतो, मे मासात लग्न-मुंजीत व्यय होतो, दिवाळीत खरेदीला पैसे लागतात. महिला त्यांच्या औषधांचे पैसे वाचवतात; पण हे गणित कुणाच्या गावीही नसते. रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय यांना झालेल्या त्रासाला तर या जमाखर्चात कुठेच स्थान नसते. आपल्या दृष्टीने इतके नगण्य असलेले आरोग्य आपल्याला का आणि कसे बरे प्राप्त होईल ?
८. ‘आरोग्य चांगले असेल, तरच ऐहिक आणि पारमार्थिक सुखे प्राप्त करणे शक्य आहे’, हे लक्षात घेऊन आरोग्याला प्राधान्य द्या !
स्वामी विवेकानंदांची (नरेंद्रची) एक गोष्ट आहे. ‘मी देव पाहिला आहे आणि तुलाही तो दिसू शकतो’, असे ठामपणे सांगणारे एकटे स्वामी रामकृष्ण त्यांना भेटले. त्यामुळे नरेंद्र त्यांना वरचेवर भेटू लागला; पण परमेश्वराचे दर्शन काही होईना. शेवटी नरेंद्रने रामकृष्णांना एकदा विचारले, ‘‘मला देव कधी दिसेल ?’’ दुसर्या दिवशी रामकृष्ण नरेंद्रला घेऊन नदीवर गेले. स्नान करतांना त्यांनी नरेंद्रचे डोके पाण्यात दाबून धरले. नरेंद्र जितका प्रतिकार करत होता, तितका स्वामी दाब वाढवत होते. सरतेशेवटी नरेंद्रने जिवाच्या आकांताने स्वत:चे बळ पणाला लावून स्वामींच्या हाताला हिसका दिला आणि डोके पाण्याबाहेर काढले. स्वामींच्या या विचित्र कृतीवर नरेंद्र नाखूश होता. इतक्यात स्वामी म्हणाले, ‘‘पाण्यात असतांना हवा मिळण्यासाठी तू जसे तीव्र प्रयत्न केलेस, तसे प्रयत्न परमेश्वर दर्शनासाठी करशील, तेव्हा तो तुला दिसेल.’’
आरोग्यही असे तीव्र इच्छेतून उद्भवलेल्या प्रयत्नांतूनच मिळू शकते. शास्त्राचा आदेश तर ‘सर्वभेव परित्यज्य शरीरं अनुपालायेत’ असा आहे, म्हणजे सर्व उद्योग बाजूला ठेवून आधी आरोग्य प्राप्त करून घ्यावे. आरोग्य असेल, तर बाकी ऐहिक आणि पारमार्थिक सुखे प्राप्त करता येतात अन् उपभोगता येतात. कलियुगातील मनुष्य मात्र आरोग्य बाजूला ठेवून ऐहिक सुखे प्राप्त करण्याच्या मागे लागला आहे. त्यातूनच ‘तेल गेले नि तूपही गेले’, अशी अवस्था होते. आपली अशी परवड होऊ नये; म्हणून हा आरोग्य जागर…!
– वैद्या सुचित्रा कुलकर्णी (साभार : ‘विवेक विचार’ संकेतस्थळ)