भीष्माचार्य शरपंजरी !
‘मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी’ या तिथीला महाभारत युद्धात ‘भीष्माचार्य शरपंजरी’ झाले. त्या निमित्ताने…
‘मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी या तिथीच्या दिवशी महाभारताच्या युद्धात कौरवांकडील विख्यात सेनापती भीष्माचार्य यांनी शरपंजरी देह ठेवला. ९ – १० दिवस युद्ध होऊनही पांडवांकडील कोणतीही हानी होत नाही, हे पाहून दुर्याेधन कर्णाकडे सेनापती पद देण्याचा विचार करत होता. त्या वेळी पितामह भीष्म संतप्त होऊन बोलले, ‘‘उद्या मी मरेन, नाही तर पांडव तरी मरतील. मी उद्या असे युद्ध करतो की, त्याची आठवण सहस्रो वर्षे लोक काढत रहातील.’ वीरश्रीच्या आवेशात भीष्माचार्य कौरवसेनेस मागे टाकून बरेच पुढे गेले. रक्षक मागे राहिले. ही संधी साधून श्रीकृष्णाच्या सल्ल्यावरून अर्जुनाने शिखंडीचा रथ पुढे केला आणि अर्जुनाने बाण सोडण्यास आरंभ केला. ‘शिखंडीवर बाण सोडायचे नाहीत’, ही भीष्मांची प्रतिज्ञा होती ! शिखंडीला पुढे पाहून भीष्मांनी धनुष्य खाली ठेवले आणि त्या वेळी शेकडो बाण कवच फोडून त्यांच्या अंगात घुसले. अर्जुनाने पितामह भीष्म यांचे धनुष्य आणि त्यांची अन्य शस्त्रेही तोडली.
अंगात घुसलेल्या बाणांमुळे ते अक्षरशः ‘शरपंजरी’च राहिले. दोन्ही पक्षांकडील वीरश्रेष्ठ भीष्मांच्या भोवती जमले. भीष्मांनी ‘डोके लोंबकळत आहे’, असे म्हणताच काहींनी आणलेल्या मोठ्या उशा त्यांनी नाकारल्या. तेव्हा अर्जुनाने ३ बाण मारून त्या बाणांनी भीष्मांचे डोके सावरून धरले. भीष्म क्षीण स्वरात बोलले, ‘‘माझा देह बाणांवरच असू द्या. उत्तरायण होईपर्यंत मी असाच प्राण धरून ठेवणार आहे. वडिलांच्या आशीर्वादाने मी इच्छामरणी आहे.’’
(साभार : ‘दिनविशेष (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन)’)