नागपूर ते शिर्डी शयनयान बस १५ डिसेंबरपासून चालू होणार !
|
नागपूर – मुंबई-नागपूरला जोडणार्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या ५२० कि.मी.च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर या दिवशी झाले होते. त्यानंतर १५ डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी अशी ‘नॉन एसी शयनयान’ बससेवा चालू करण्यात येणार आहे.
विना थांबा असलेली ही शयनयान बस नागपूर येथील गणेशपेठ बसस्थानकावरून रात्री ९ वाजता सुटून दुसर्या दिवशी पहाटे ५.३० वाजता शिर्डी येथे पोचेल. बसचे भाडे १ सहस्र ३०० रुपये राहील, असे विभाग नियंत्रकांनी सांगितले. या बसमध्येही ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य, तर ६५ वर्षांवरील नागरिकांना ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.
नागपूर ते शिर्डी ९०० रुपये पथकर !
पहिल्या टप्प्यात (नागपूर ते शिर्डी) मुख्य मार्गिकेवर फक्त वायफळ येथे पथकर नाका असणार आहे. त्यानंतर एकूण २० नाके आहेत. निर्गमन पथकर पद्धतीनुसार समृद्धी महामार्गावर जेवढ्या अंतराचा प्रवास होईल, तेवढाच पथकर आकारण्यात येणार असल्याने सद्य:स्थितीत नागपूर ते शिर्डी हलक्या वाहनांसाठी अनुमाने ९०० रुपये एवढा पथकर असेल. पथकर हा ‘फास्ट टॅग’, ‘कार्ड’, ‘वॅालेट’, रोख अथवा ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.