पुरस्कारप्राप्त व्यक्ती समाजाला प्रेरणा देणार्या ! – रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक
रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण संघाच्या वतीने वार्षिक पुरस्कारांचे वितरण
रत्नागिरी – कर्हाडे ब्राह्मण संघ केवळ ज्ञातीबांधवांनाच नव्हे, तर समाजातील चांगल्याचे कौतुक करत चांगल्या व्यक्तींनाही पुरस्कार देत आहे. कुणाच्या पोटी जन्माला यायचे ते परमेश्वर ठरवतो; पण कर्तृत्व आपल्या हातात आहे. पुरस्कार विजेते हलाखीच्या परिस्थितीत, मध्यम कुटुंबातून पुढे आलेले आहेत. प्रचंड कष्ट करून स्वत:च्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो, हे या व्यक्तींनी दाखवून दिले आहे. त्यामुळे आजच्या पुरस्कारप्राप्त व्यक्ती या उत्तुंग आणि समाजाला प्रेरणा देणार्या आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक आणि पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी केले. येथील कर्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम राणी लक्ष्मीबाई सभागृहात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.
(सौजन्य : Kokan Media Ratnagiri)
श्री. प्रभुदेसाई पुढे म्हणाले की, पुरस्कार मिळवण्यासाठी परिपूर्ण वाचन, अभ्यास आणि साधना प्रतिदिन आवश्यक ठरते. पुरस्कार विजेत्यांनी आपापल्या क्षेत्रात या सर्वाला न्याय दिला आहे, त्यामुळे ते पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
कर्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी सांगितले की, अर्ज न मागवता कार्यकारिणीच्या वतीने माहिती मिळवून या पुरस्कारांची निवड केली जाते. शाल, पुस्तक, रोख रक्कम, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कर्हाडे ब्राह्मण संघाला ९५ वर्षे झाली असून संस्था शतक महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. यानिमित्त नवी वास्तू उभारण्याचा संकल्प आहे. त्याकरता देणगीदारांनी साहाय्य करावे.
पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी संघाचे आभार मानतांना ‘आता या पुरस्काराने आमचे दायित्व अधिक वाढले आहे. आमच्या छोट्या कार्याची दखल संघाने घेतली याविषयी पुष्कळ आनंद वाटतो ’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.